जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पैशांच्या देवाणघेवाणीवरून वाद होऊन अलीमोद्दीन शेख किफायत शेख (वय ५४, रा. मास्टर कॉलनी, मेहरुण) या बॅण्ड मालकाला दोघा तरुणांनी शिवीगाळ करत मारहाण केली. ही घटना १५ मार्च रोजी दुपारी २:१५ वाजता भिलपुरा चौकात घडली. या प्रकरणी दोघा तरुणांविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मेहरुणमधील मास्टर कॉलनीत राहणारे अलीमोद्दीन शेख यांचे भिलपुरा चौकात बॅण्डचे कार्यालय आहे. १५ मार्च रोजी सागर चित्ते आणि किशोर जाधव हे त्यांच्या कार्यालयात आले. पैशांच्या थकबाकीवरून त्यांनी अलीमोद्दीन यांचे मोठे भाऊ शाबुद्दीन शेख यांच्यासोबत वाद घातला. त्यानंतर त्यांनी अलीमोद्दीन यांना चापट्या-बुक्यांनी मारहाण केली. यावेळी त्यांनी अलीमोद्दीन यांचे दुसरे भाऊ नुरोद्दीन शेख यांनाही ढकलून देऊन त्यांचा हात मुरगळला. तसेच, त्यांना शिवीगाळ करून धरणगाव येथे वाजवायला आल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. या घटनेनंतर अलीमोद्दीन शेख यांनी शनिपेठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सागर पुना चित्ते (वय ३५, रा. धरणगाव) आणि किशोर फकिरा जाधव (वय ३०, रा. धरणगाव) यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार शशिकांत पाटील या प्रकरणाचा तपास करत आहेत.