Home धर्म-समाज शनिशिंगणापूरमध्ये शनिअमावास्येला चौथऱ्यावर दर्शनास बंदी 

शनिशिंगणापूरमध्ये शनिअमावास्येला चौथऱ्यावर दर्शनास बंदी 


अहिल्यानगर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा । प्रत्येक शनिअमावास्येला लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या शनिशिंगणापूर येथे यंदा मोठा बदल पाहायला मिळणार आहे. शनिदेवाच्या दर्शनासाठी देश-विदेशातून येणाऱ्या शनीभक्तांसाठी यंदाची शनिअमावास्या थोडी वेगळी असणार आहे. प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर देवस्थान प्रशासनाने शनिचौथऱ्यावर भाविकांना प्रवेशबंदी करण्याचा निर्णय घेतला असून, ही बंदी शनिअमावास्येच्या दिवशी म्हणजे २२ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही शनिअमावास्येला शनिशिंगणापूर येथे लाखोंच्या संख्येने भाविक दाखल होण्याची शक्यता आहे. शनिदेवाच्या मूर्तीला तेलाभिषेक करण्यासाठी अनेक शनीभक्त स्वतः चौथऱ्यावर जाऊन पूजा-अर्चा करतात. मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याचा अंदाज घेत देवस्थान समितीने सुरक्षेच्या दृष्टीने भाविकांना थेट चौथऱ्यावर जाण्याची परवानगी नाकारली आहे. शनिदेवाचे दर्शन मंदिराच्या प्रवेशद्वारातूनच घ्यावे लागणार असून, चौथऱ्यावर जाण्यास मनाई असेल. हे निर्बंध २२ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते २३ ऑगस्टच्या दिवसभरासाठी लागू राहतील. यावेळी तेलाभिषेक, स्पर्शदर्शन किंवा चौथऱ्यावर चढण्याची परवानगी नसेल, असा स्पष्ट इशारा प्रशासनाने दिला आहे.


Protected Content

Play sound