अमळनेर प्रतिनिधी । अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार करणाऱ्या चहार्डी येथील नराधमास अमळनेर जिल्हा सत्र न्यायालयाचे न्या. विक्रम आव्हाड यांनी 10 वर्षाची सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे.
थोडक्यात हकीकत अशी की, चहार्डी येथील पिंजारी वाड्यातून सतीश दिलीप चौधरी (वय-27) याने 20 डिसेंबर 15 रोजी रात्री 8 वाजता अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमीष दाखवत पळवून नेले. याबाबत पिडीत मुलीच्या आईने दुसऱ्या दिवशी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक रोहिदास सोमवंशी यांनी केला. सतीशने पीडित मुलीला औरंगाबाद येथील रांजणगाव एमआयडीसी मध्ये खोली करून ठेवले आणि वारंवार तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. त्यावेळी त्याने तिला लग्नास वयाची अडचण येत आहे. तोपर्यंत आपण तेथेच राहू असे सांगितले. दरम्यान 10 मार्च 16 रोजी पोलिसांना दोघे औरंगाबाद येथे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी मुलीला आणून तिची वैद्यकीय तपासणी करून तिचे जबजाबाब घेतले असता तिने आपल्या आईला सतीशने कसा अत्याचार केला हे कथन केले. पोलिसांनी सतीश विरुद्ध पुरवणी जबाबवरून गुन्हा नोंदवून त्याला अटक केली होती. आरोपी जामीनावर होता. हा खटला अमळनेर येथील जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होता. सरकारी वकील ॲड. शशिकांत पाटील यांनी एकूण 13 साक्षीदार तपासले त्यात प्रामुख्याने पीडित मुलगी, तिची आई, महिला पोलीस प्रमिला पवार, पोलीस उप निरीक्षक रोहिदास सोमवंशी, चोपडा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गुरुदास वाघ यांची साक्षी महत्वाची ठरली. न्या विक्रम आव्हाड यांनी आरोपीला 376 (2) मध्ये व पोस्को कायद्यांतर्गत 10 वर्षाची सक्त मजुरी व 5 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 6 महिने शिक्षा तसेच अपहरण प्रकरणी 3 वर्षे शिक्षा व 3 हजार रुपये दंड न भरल्यास 3 महिने शिक्षा सुनावली पोलिसांनी आरोपी सतीश यास ताब्यात घेऊन जिल्हाकरगृहात रवाना केले आहे.