मुंबई – रस्ते अपघातातील जखमींवर तातडीने उपचार व्हावेत, यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना सुरू करण्यात आली असून राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या योजनेला मंजुरी देण्यात आली आहे.
अपघातग्रस्त व्यक्तीला ताबडतोब उपचार मिळाल्यास त्याचा जीव वाचू शकतो, तसेच त्याच्या अपघातावरचा खर्च दिल्यास, त्याला दिलासा मिळू शकतो. आरोग्य विभागाच्या माध्यमातून अपघातग्रस्त व्यक्तींना विम्याचा लाभ देण्यासाठी बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना पुन्हा कार्यान्वित करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अपघातग्रस्त व्यक्तीला ३0 हजार रुपयापर्यंतच्या उपचाराचा खर्च शासनाकडून मोफत करण्यात येणार आहे. या योजनेच्या माध्यमातून देशभरातील कुठल्याही नागरिकाला राज्यात अपघात झाल्यास, त्याला मदत मिळणार आहे. तत्कालीन शिवसेना-भाजपच्या सरकारच्या कार्यकाळातील ही योजना आहे. तब्बल 5 वर्षांनी अखेर या योजनेला मंजुरी मिळाली आहे.
रस्ते अपघातातील जखमींचा जीव वाचवा यासाठी या योजनेच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. यात 74 वेगवेगळ्या अपघाताचा समावेश करण्यात येईल. या योजनेसाठी 125 कोटी खर्च अपेक्षित असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली आहे.