नोकरीचे आमिष, दागिन्यांवर डल्ला; जळगावात महिलेला घातला साडे दहा लाखांचा गंडा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील नेहरूनगर परिसरात राहणाऱ्या एका महिलेला तिच्या मुलीला तहसीलदार म्हणून नोकरीला लावून देण्याचे आमिष दाखवून तसेच शासकीय योजनेच्या अर्ज भरण्याच्या नावाखाली लोकांकडून गोळा केलेले पैसे आणि घरातील दागिने व रोकड असा एकूण तब्बल १० लाख ५३ हजार ९५० रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी कल्पना आत्माराम कोळी (वय-५३, रा.नेहरूनगर जळगाव) यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी ज्योती अशोक साळुंखे (रा.मन्यारवाडा जळगाव) या महिलेविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कल्पना कोळी यांची ज्योती साळुंखे नावाच्या महिलेशी एका कार्यक्रमात ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाल्यावर ज्योती साळुंखे हिने कल्पना कोळी यांना त्यांच्या मुलीला वैशाली कोळीला तहसीलदार म्हणून नोकरीला लावून देण्याचे प्रलोभन दाखवले. यावर विश्वास ठेवून कल्पना कोळी यांनी वेळोवेळी ज्योती साळुंखे यांना एकूण ४ लाख २२ हजार रुपये रोख दिले. त्यानंतर आणखी पैशांची मागणी झाल्यावर कल्पना कोळी यांनी आपल्या घरातील ३ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिनेही ज्योती साळुंखे यांच्या हवाली केले.

इतकेच नव्हे, तर ज्योती साळुंखे हिने कल्पना कोळी यांची मुलगी वैशाली कोळी यांनाही शासकीय योजनेच्या अर्ज भरण्याच्या कामात गुंतवले. एका अर्जामागे १०० रुपये मिळतील, असे सांगून वैशाली यांच्याकडून तब्बल ५६० लोकांकडून अर्ज भरून घेतले आणि त्यापोटी जमा झालेले ३ लाख ५१ हजार ९५० रुपये स्वतः घेतले. अशा प्रकारे ज्योती साळुंखे हिने कल्पना कोळी आणि त्यांच्या मुलीकडून एकूण १० लाख ७३ हजार ९५० रुपये उकळले.

कालांतराने जेव्हा मुलीला नोकरी लागली नाही, तेव्हा कल्पना कोळी यांनी ज्योती साळुंखे यांच्याकडे विचारणा केली. मात्र, ज्योती साळुंखे यांनी पैसे परत देण्यास स्पष्ट नकार दिला आणि कल्पना कोळी यांना शिवीगाळ करत धमकी दिली. “माझी वरपर्यंत पोहोच आहे, तुम्ही जर माझ्याकडे आलात तर तुमचे हातपाय तोडून तुम्हाला संपवायलाही कमी करणार नाही,” अशा शब्दांत तिने कल्पना कोळी यांना धमकावले. या सर्व प्रकारानंतर हताश झालेल्या कल्पना कोळी यांनी रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन ज्योती अशोक साळुंखे यांच्याविरोधात फसवणुकीची फिर्याद दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला असून, पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र तावडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Protected Content