Home Cities जळगाव बहुजन समाजाचा मोर्चा : ओबीसी हक्क आणि ईव्हीएम विरोधात तीव्र घोषणाबाजी

बहुजन समाजाचा मोर्चा : ओबीसी हक्क आणि ईव्हीएम विरोधात तीव्र घोषणाबाजी


जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चा या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने जळगावात मंगळवारी (१५ ऑक्टोबर) भव्य जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. ईव्हीएम हटविणे, ओबीसींची जातीनिहाय जनगणना, पदोन्नतीत आरक्षण, तसेच शेतकरी, कामगार आणि बहुजन समाजाच्या विविध मागण्यांसाठी हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला.

हा मोर्चा छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यास अभिवादन करून दुपारी १२ वाजता जी.एस. ग्राउंड येथून सुरू झाला. मोर्चाचे नेतृत्व भारत मुक्ती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष देवानंद निकम, राष्ट्रीय ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुभाष नावडे पाटील, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाचे जिल्हा संयोजक वसंत कोलते आणि बहुजन क्रांती मोर्चाचे जिल्हा संयोजक कुंदन तायडे यांनी केले. मोर्चेकरांनी “ईव्हीएम हटवा”, “ओबीसी जनगणना करा”, “बहुजन हक्क द्या”, “शेतकऱ्यांना न्याय द्या” अशा घोषणा देत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.

मोर्चेकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी जयश्री महाजन यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात ईव्हीएम ऐवजी सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेणे, ओबीसींसह सर्व जातींची जातीनिहाय जनगणना करणे, आदिवासींवरील अन्याय रोखणे, महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देणे, मुस्लिम समुदायावर होणाऱ्या अन्यायाला आळा घालणे आणि एससी-एसटी-ओबीसी कर्मचाऱ्यांना पदोन्नतीत आरक्षण लागू करणे यासारख्या राष्ट्रीय मागण्या मांडण्यात आल्या.

तसेच, शेतकऱ्यांसाठी स्वामिनाथन आयोगाच्या शिफारसी अंमलात आणणे, जळगाव जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करणे, विद्यार्थ्यांना वेळेवर शिष्यवृत्ती देणे, महिलांवरील अत्याचार रोखणे, कंत्राटी पद्धतीतील भरती बंद करणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सन्मानजनक पेन्शन योजना देणे आणि नव्या शैक्षणिक धोरणातील बहुजनविरोधी तरतुदी रद्द करणे यासारख्या स्थानिक आणि सामाजिक मागण्याही करण्यात आल्या.

मोर्चात जिल्हाभरातील शेकडो कार्यकर्ते, महिला आणि युवक सहभागी झाले. विविध संघटना राष्ट्रीय किसान मोर्चा, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क, राष्ट्रीय मुलनिवासी पेंन्शनर संघ, लहुजी क्रांती मोर्चा, छत्रपती क्रांती सेना, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद आणि मौर्य क्रांती संघ यांनीही सहभाग नोंदवून मोर्चाला भक्कम पाठींबा दिला.

मोर्चाच्या शेवटी आयोजकांनी सांगितले की, सरकारने या मागण्यांकडे तातडीने लक्ष दिले नाही तर राज्यभर उग्र आंदोलन उभारले जाईल. बहुजन समाजाला न्याय आणि समानतेसाठी हा जनआक्रोश पुढेही सुरू राहील, असा इशारा त्यांनी दिला.


Protected Content

Play sound