जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । श्रावण महिन्यात निसर्ग, साहित्य आणि भावविश्व यांचा सुरेल संगम घडवणाऱ्या ‘हिरिताचं देनं घेनं’ या श्रावण काव्यसंध्येने जळगावातील रसिकांना अविस्मरणीय अनुभव दिला. बहिणाबाई चौधरी यांची १४५वी जयंती साजरी करताना त्यांच्या काव्यसंपदेचा साज चढवण्यात आला आणि विविध कवी-कवयित्रींच्या स्वरचित कविता, गजल आणि भावकवितांनी संपूर्ण वातावरण भारले.

बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अॅण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भाऊंचे उद्यान येथे ‘हिरिताचं देनं घेनं’ या श्रावण काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. निसर्गकन्या बहिणाबाईंच्या कविता हे कार्यक्रमाचे केंद्रबिंदू ठरल्या. त्यांच्या ओव्यांतून ग्रामीण जीवन, स्त्रियांचे अंतरंग, श्रमजीवी जीवनशैली आणि निसर्गाशी असलेली नाळ याचे सुरेख दर्शन घडले.

कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून प्रख्यात कवी किरण डोंगरदिवे (बुलढाणा), कवयित्री रेणुका खटी पुरोहित (पुणे), माया धुप्पड, विमल वाणी, तसेच ट्रस्टचे विश्वस्त दिनानाथ चौधरी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी बहिणाईंच्या पणतसून स्मिता चौधरी उपस्थित होत्या. प्रतिमा पूजनाने सुरुवात झालेल्या या कार्यक्रमाचा आरंभ जयश्री मिस्त्री यांच्या ‘कवयित्री माझी माय’ व ‘अरे संसार संसार’ या सुमधुर कविता गाऊन करण्यात आला.
कविवर्य किरण डोंगरदिवे यांनी ‘श्रावण मासी हर्ष मानसी’ या कवितेवर सखोल भाष्य करत साहित्य व निसर्ग यांच्यातील दुवा उलगडला. बहिणाबाई, ना.धों.महानोर आणि बालकवींनी निसर्गाला शब्दरूप दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांनी सादर केलेली ‘शाळेच्या वाटेवर बोरं विकत होती म्हातारी’ ही कविता विशेष गाजली.
माया धुप्पड यांनी बहिणाबाईंच्या कविता ही निसर्गाची लिपी असल्याचे सांगत ‘परशुराम बेलदारा’ आणि ‘श्रावण उत्सव’ या कविता सादर केल्या. त्यांनी साहित्य हे मन घडवण्याचे माध्यम असून सामाजिक स्थैर्यासाठी साहित्याची गरज अधोरेखित केली.
रेणुका खटी पुरोहित यांनी कविता केवळ वाचण्याची नव्हे तर अनुभवण्याची गोष्ट आहे, असे म्हणत आत्मविश्वास वाढवणाऱ्या कविता सादर केल्या. त्यांची ‘श्रोता’, ‘श्वासाची धडपड’, आणि ‘अवघड होते आयुष्याचे गणित’ ही गजल रसिकांच्या मनात घर करून गेली.
विमल वाणी यांनी ‘आज दिवस पहा सोनियाचा’ आणि ‘म्हण माहेर खान्देश’ या रचनांद्वारे प्रेक्षकांचे टाळ्यांचे कडकडाट मिळवले. त्यानंतर दादासाहेब वाघ, शितल पाटील, अरविंद महाजन, वंदना महाजन, संगिता महाजन, पुष्पा साळवे, प्रकाश पाटील यांनी देखील आपल्या कविता सादर करून सायंकाळ आणखी खुलवली.
कार्यक्रमाच्या समारोपात सहभागी कवी-कवयित्रींचा सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला. अशोक चौधरी यांनी तुळशीचे रोप व ग्रंथसंपदा देऊन मान्यवरांचे स्वागत केले. सूत्रसंचालन आणि कवी-परिचय ज्ञानेश्वर शेंडे यांनी अतिशय प्रवाहीपणे पार पाडले. आभारप्रदर्शन किशोर कुळकर्णी यांनी केले.



