Home Cities जळगाव एनआयआरएफ मानांकनात बहिणाबाई विद्यापीठाची यशस्वी घोडदौड कायम

एनआयआरएफ मानांकनात बहिणाबाई विद्यापीठाची यशस्वी घोडदौड कायम

0
363

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी ।  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने आपल्या उत्कृष्ट शैक्षणिक कार्यपद्धती आणि संशोधनमूल्यवान प्रयत्नांमुळे पुन्हा एकदा देशपातळीवर आपली वेगळी छाप सोडली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने नुकत्याच जाहीर केलेल्या नॅशनल इन्स्टिट्युशनल रँकिंग फ्रेमवर्क (NIRF) २०२५ मध्ये विद्यापीठाने सार्वजनिक अनुदानित राज्य विद्यापीठांच्या गटात ५१ ते १०० या क्रमांकात स्थान मिळवून आपले यश पुन्हा सिद्ध केले आहे.

गुरुवार, दि. ४ सप्टेंबर रोजी केंद्रीय मंत्रालयाने देशभरातील उच्च शिक्षण संस्थांची क्रमवारी जाहीर केली. या मानांकनामध्ये संपूर्ण भारतातील नामवंत विद्यापीठांचा समावेश असून, त्यात बहिणाबाई विद्यापीठाने आपले स्थान टिकवून ठेवणे ही निश्चितच गौरवाची बाब आहे. एनआयआरएफ रँकिंगसाठी अध्ययन, अध्यापन पद्धती, संशोधन कार्य, परीक्षा निकाल, सामाजिक समावेश, संसाधन व्यवस्थापन यासारख्या विविध निकषांचा विचार केला जातो.

कुलगुरू प्रा. व्ही.एल. माहेश्वरी यांच्या नेतृत्वात विद्यापीठाने गेल्या तीन वर्षांत शैक्षणिक आणि प्रशासकीय कामकाजात नवे उच्चांक गाठले आहेत. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत विद्यापीठाने विद्यार्थ्यांसाठी तयार केलेली ओपन चॉईस बेस्ड पुस्तके, एम्बेडेड डिग्री प्रोग्राम्स अंतर्गत सुरू केलेले नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम, तसेच संशोधन कार्यातील योगदान यामुळे विद्यापीठाला प्राधान्य देण्यात आले आहे.

यापूर्वीही एक नामांकित इंग्रजी नियतकालिकाने घेतलेल्या सर्वेक्षणात भारतातील बहुविद्याशाखीय विद्यापीठांच्या गटात बहिणाबाई विद्यापीठाला ३१ वे स्थान आणि पश्चिम भारतातील विद्यापीठांमध्ये ९ वे स्थान मिळाले होते. ही कामगिरी आता एनआयआरएफ रँकिंगमध्येही अधोरेखित झाल्यामुळे विद्यापीठाच्या शैक्षणिक विश्वासार्हतेला आणखी बळकटी मिळाली आहे.

संशोधन निबंधांचे प्रमाण, पेटंट नोंदणी, प्रगत संशोधन प्रकल्पांची संख्या आणि विद्यार्थ्यांना मिळणारी प्लेसमेंटची संधी या सर्वच निकषांमध्ये विद्यापीठाने सातत्याने प्रगती दर्शवली आहे. विद्यार्थ्यांची वाढती संख्या, उत्कृष्ट शैक्षणिक साधने, वाचनालये, प्रयोगशाळा आणि अभ्यासकांचा दर्जा यामुळे विद्यापीठाची ओळख एक गुणवत्तापूर्ण शैक्षणिक केंद्र म्हणून झाली आहे.


Protected Content

Play sound