बदलापूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | बदलापूरमध्ये मंगळवारी २० ऑगस्ट रोजी नागरिकांचा उद्रेक पाहायला मिळाला. दोन चिमुकल्या मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधात हजारो नागरिक आंदोलनासाठी उतरले. नागरिकांचा एक गट आदर्श शिक्षण संस्थेच्या शाळेच्या आवारात आंदोलन करत होता. तर एका गटाने रेल्वेस्थानकात घुसून रेल्वेवाहतूक तब्बल १० तास रोखून ठेवली. पोलीस प्रशासन आणि सरकारतर्फे हे आंदोलन थांबविण्यासाठी अनेक प्रयत्न झाले. मात्र अखेर सायंकाळी सौम्य लाठीचार्ज करून आंदोलकांना पांगण्यात आले. आता पोलिसांनी हे आंदोलन पूर्वनियोजित असल्याचे सांगितले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, छापील फलक, व्हॉट्सॲप ग्रुपवरील मेसेज आणि इतर काही संकेतावरून हे आंदोलन पूर्वनियोजित असल्याचे समजते. लैंगिक अत्याचार प्रकरणात एफआयआर दाखल झाल्यानंतर सोमवारीच हे आंदोलन करण्याचा काही राजकीय पक्षांचा प्रयत्न होता. मात्र सोमवारी रक्षाबंधन असल्यामुळे आंदोलन मंगळावारी करण्याचा निर्णय घेण्यात आला. काही व्हॉट्सॲप ग्रुप तयार करून त्यावरून लोकांना आंदोलनात सामील होण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यामुळे मंगळवारी सकाळी ६ वाजल्यापासूनच आंदोलक बदलापूर स्थानकाच्या बाहेर जमण्यास सुरुवात झाली होती. सकाळी १० वाजता रेल्वे सेवा पहिल्यांदा रोखली गेली. त्यानंतर ११ वाजता आदर्श शाळेबाहेरही आंदोलकांचा एक घोळका जमा झाला आणि त्यांनी शाळेत तोडफोड केली. शाळा आणि बदलापूर स्थानकात दगडफेक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले जाणार आहेत. आतापर्यंत डझनभर लोकांना अटक करण्यात आली आहे.