
चोपडा(प्रतिनिधी) शहरातील नगरपालिकाचे महात्मा गांधी उद्यान हे येथे येणाऱ्या बालगोपालांसाठी अतिशय धोकादायक ठरत आहे. या उद्यानातील खेळणी ही अतिशय खराब झाली असून त्यात मुलांना इजा वजा दुखापत झाल्याच्या घटना देखील अलीकडच्या काळात घडल्या आहेत.

सध्या सर्वच शाळांना उन्हाळी सुट्या लागल्या आहेत. शाळांच्या वार्षिक परीक्षा या संपल्या असून तणावमुक्त होत विद्यार्थी अक्षय तृतीया निमित्ताने मामाच्या गावाला गेलेत तर काही मामाच्या गावाला आले आहेत. त्यामुळे मौज मस्तीसाठी हे बालगोपाल शहरातील धरणगाव नाक्याजवळ असलेल्या नगरपालिकेच्या महात्मा गांधी उद्यानात येतात. मात्र या उद्यानात असलेले खेळण्यासाठीचे साहीत्य हे खराब तथा सुस्थितीत नाहीय. या खेळण्यांचा वापर मुलांनी केल्यास त्यांना जखमांना सामोरे जावे लागते आहे. घसरगुंडीचा पत्रा हा आबडधोबड स्वरूपाचा झाल्याने या लहान लहान मुलांना राईड घेतांना अंगाला कापले जाऊन ते जखमी झाले असल्याच्या घटना अलीकडे घडल्या आहेत. उद्यानात कारंजा असून त्यात फवारे उडण्यासाठी विजेची पाण्याची मोटार आहे. मात्र, ती कितपत योग्य स्थितीत असल्याबाबत देखील नागरिकांच्या मनात भीती आहे. अर्थात येथील वॉचमन त्या पाण्यात कोणालाही हात टाकू देत नाही. मात्र, नकळत कोणी हात टाकला व शॉक लागला तर मोठी दुर्घटना होऊ शकते, अशी चिंता देखील नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे.

चोपडा शहराची लोकसंख्या जवळपास ८० हजार एवढी आहे. लोकसंख्येच्या मानाने विचार केला असता शहरवासीयांना सदरील उद्यान हे लहानच पडते. मात्र याव्यतिरिक्त दुसरा पर्याय नसून सायंकाळी ५ ते ८ या वेळात विरुंगळा म्हणून नागरिक या उद्यानात बालगोपालांसह येत असतात. मात्र हेच महात्मा गांधी उद्यान आता धोकादायक ठरू पाहत असल्याने नगरपालिका प्रशासनाने याकडे वेळीच लक्ष घालावे व धोकादायक खेळण्यांना दुरुस्त अथवा नवीन बसवावे, अशी मागणी शहरवासीयांसह महात्मा गांधी उद्यान प्रेमींनी केली आहे.
