Home Cities अमळनेर ‘प्रहार’चे अध्यक्ष बच्चू कडूंची अमळनेरमध्ये भेट, दिव्यांग मुलांच्या शिक्षणाबाबत चर्चा !

‘प्रहार’चे अध्यक्ष बच्चू कडूंची अमळनेरमध्ये भेट, दिव्यांग मुलांच्या शिक्षणाबाबत चर्चा !


अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष तथा माजी आमदार बच्चू कडू यांनी अमळनेर येथे दिव्यांग आणि गतिमंद मुलांच्या समस्यांबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. अमळनेर येथे माजी आमदार कै. साथी गुलाबराव पाटील यांच्या स्मृती सोहळ्याला ते प्रमुख पाहुणे म्हणून आले होते. याच कार्यक्रमात परिश्र मतिमंद मुला-मुलींच्या निवासी शाळेचे अध्यक्ष डॉ. योगेश रघुनाथ महाजन यांनी त्यांच्याशी दिव्यांग विद्यार्थ्यांच्या अडचणींवर चर्चा केली.

शिक्षण आणि अनुदानाची मागणी
डॉ. योगेश महाजन यांनी बच्चू कडू यांच्याकडे दिव्यांग आणि मतिमंद विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण आणि इतर सुविधा मिळाव्यात यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची विनंती केली. राज्यात २० वर्षांहून अधिक काळ अनेक दिव्यांग आणि मतिमंद मुला-मुलींच्या निवासी शाळा विनाअनुदानित कार्यरत आहेत. या शाळांना अनुदान मिळावे, अशी मागणी त्यांनी केली. डॉ. महाजन यांच्या म्हणण्याला प्रतिसाद देत बच्चू कडू यांनी तातडीने दिव्यांग विभागाचे सचिव तुकाराम मुंडे यांना फोन करून या समस्यांबाबत माहिती दिली आणि या शाळांना अनुदान देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

संवेदनशीलतेचे दर्शन
या भेटीमुळे बच्चू कडू यांनी दिव्यांग मुलांच्या प्रश्नांवर असलेल्या त्यांच्या संवेदनशील भूमिकेचे पुन्हा एकदा दर्शन घडवले. यावेळी त्यांना कै. साथी गुलाबराव पाटील यांच्या स्मृती समारोहानिमित्त ‘राजकीय पुरोगामी पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. या महत्त्वपूर्ण चर्चेवेळी मारवड शिक्षण मंडळाचे अध्यक्ष जयवंतराव पाटील, माजी नगरसेवक विक्रांत पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. ही चर्चा दिव्यांग मुलांच्या भवितव्यासाठी एक आशेचा किरण ठरली आहे.


Protected Content

Play sound