अमरावती-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | राज्यात ‘पन्नास खोके. . .एकदम ओके’ हे घोषवाक्य धमाल करत असतांना याचवरून आता दोन शिंदे समर्थक आमदारांमधील वाद आता थेट पोलीस स्थानकात पोहचला आहे.
अमरावती जिल्ह्यातील मातब्बर नेते म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यातील वाद आता मोठ्या प्रमाणात चिघळला आहे. रवी राणा यांनी केलेल्या आरोपांविरोधात बच्चू कडू यांनी पोलिसांमध्ये तक्रार दिलीय.
रवी राणा यांनी अलीकडेच बच्चू कडू हे पैसे घेतल्यानंतरच गुवाहाटी येथे गेले होते असा गंभीर आरोप केला होता. या पार्श्वभूमिवर, कडू यांनी आता थेट आपली बदनामी झाल्याचा आरोप करत पोलीस ठाणे गाठल्याने खळबळ उडाली आहे.
रवी राणा यांनी माझी बदनामी केली आहे. २०-२० वर्ष आमची राजकिय करिअर उभं करायला गेली. मी पैसे घेऊन जर गुवाहाटीला गेलो असेल तर पैसे देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथ शिंदेजी यांनी यांनी याचे उत्तर दिले पाहिजे असे बच्चू कडू म्हणाले. या संदर्भात आपण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील नोटीस पाठवणार आहे. तुम्ही पैसे दिले असेल तर स्पष्ट करा अशी मागणी या नोटीसद्वारे करणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले. रवी राणा यांच्यासोबत आरपारची लढाई लढायला मी तयार आहे. जिथे म्हणाल तिथे एकटा यायला तयार आहे. काय तोडपानी केलं त्याचे एक तारखे पर्यंत पुरावे द्या आणि आरोप सिद्ध करा. आरोप सिद्ध झाले नाहीत तर मी त्यांच्या घरी भांडे घासेन असे देखील बच्चू कडू म्हणाले.
दरम्यान, या दोघांच्या भांडणामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मध्यस्थी करणार असल्याची माहिती आहे.