नवी दिल्ली वृत्तसंस्था । अॅलोपॅथीच्या उपमर्दामुळे वादात सापडलेले योगगुरू बाबा रामदेव हे नव्या वक्तव्याने पुन्हा चर्चेत आले आहेत. लस घेऊनही देशातील एक हजारांपेक्षा जास्त डॉक्टर्स मेल्याने हे कसले डॉक्टर ? असे वक्तव्य त्यांनी केले असून याचा आता विरोध होऊ लागला आहे.
बाबा रामदेव यांनी काही दिवसांपूर्वीच अॅलोपॅथीचा काहीही उपयोग होत नसल्याचे वक्तव्य करून वाद ओढावून घेतला होता. यावरून इंडियन मेडिकल असोसिएशनने त्यांच्या विरूध्द आक्रमक पवित्रा घेतल्यामुळे अखेर बाबांनी या प्रकरणी माफी मागून सारवासारव केली होती. यामुळे हा वाद निवळला होता.
यानंतर रामदेवबाबा यांचा पुन्हा एक नवीन व्हिडीओ समोर आला असून यातील त्यांचे वक्तव्य वादाचा विषय बनले आहे. यात या व्हिडीओमध्ये बाबा रामदेव यांनी डॉक्टरांसंदर्भात वक्तव्य करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ बाबा रामदेव यांच्या एका योग अभ्यास वर्गातील आहे. व्हिडीओमध्ये रामदेव योगा करता करता योगसाधना करणाऱ्यांशी गप्पा मारताना दिसत आहेत. मात्र बोलता बोलता त्यांनी करोनाशी लढत असताना मरण पावलेल्या डॉक्टरांबद्दल वक्तव्य केलं.
एक हजार डॉक्टर करोनाच्या दोन्ही लसी घेतल्यानंतरही मेले आहेत, असं बाबा रामदेव या व्हिडीओत सांगताना दिसतात. व्हिडीओच्या सुरुवातीलाच रामदेव हे डॉक्टरांवर उपहासात्मक वक्तव्य करताना दिसतात. “तिसरा म्हणाला मला डॉक्टर व्हायचं आहे. टर…टर…टर…टर…टर…टर… डॉक्टर बनायचं आहे. एक हजार डॉक्टर तर आता करोनाच्या दोन्ही लसी घेतल्यानंतर मरण पावले. किती डॉक्टर? एक हजार… कालची बातमी आहे. स्वत:लाच वाचवू शकत नाहीत हे कसले डॉक्टर”, असं रामदेव यांनी म्हटलं आहे.
पुढे बोलताना, “डॉक्टर बनायचं असलं तर स्वामी रामदेवसारखं बना. ज्यांच्याकडे कोणतीही पदवी नाहीय तरी ते सर्वांचे डॉक्टर आहेत. कोणत्याही पदवी शिवाय, दैवत्वाशिवाय मात्र प्रतिष्ठेसहीत मी एक डॉक्टर आहे,” असं रामदेव म्हणतात दिसतात.
काँग्रेसच्या प्रवक्त्या डॉक्टर रागिनी नायक यांनी हा व्हिडीओ शेअर करून रामदेवांवर टीका केली आहे.