Home Cities जळगाव अजिंठा चौफुलीवर अयोध्या नगरवासीयांची कोंडी; मनसेचा प्रशासनाला १० दिवसांचा अल्टिमेटम

अजिंठा चौफुलीवर अयोध्या नगरवासीयांची कोंडी; मनसेचा प्रशासनाला १० दिवसांचा अल्टिमेटम


जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । शहरातील प्रमुख आणि अतिव्यस्त असलेल्या अजिंठा चौफुलीवरून अयोध्या नगरकडे जाणाऱ्या रस्त्याच्या प्रश्नाकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लक्ष वेधले असून, येथील नागरिकांना दररोज जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या समस्येवर तातडीचा तोडगा काढावा, अन्यथा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला जाईल, असा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.

अजिंठा चौफुली हा जळगाव शहरातील प्रमुख चौक असून येथून मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ होते. याच चौकावरून अयोध्या नगरकडे जाणारा एकमेव रस्ता असल्याने जवळपास ३० ते ४० हजार लोकसंख्येच्या या परिसरातील नागरिकांना गावात ये-जा करण्यासाठी रॉंग साईड सिग्नल ओलांडावा लागतो. परिणामी येथे रोजच लहान-मोठे अपघात घडत असून, वाहतूक कोंडी ही नित्याची बाब बनली आहे.

या मार्गाने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना वाहन चालवताना मोठी कसरत करावी लागत असून, समोरून येणाऱ्या जड वाहनांमुळे प्रवास अधिक धोकादायक ठरत आहे. महिला वर्गालाही या परिस्थितीचा मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचे मनसेने नमूद केले आहे.

अजिंठा चौफुलीपासून एमआयडीसीकडे जाण्यासाठी सर्व्हिस रोडची तरतूद असतानाही काही बलाढ्य व धनवान लोकांच्या हस्तक्षेपामुळे हा रस्ता आजतागायत पूर्ण होऊ शकलेला नाही, असा आरोपही करण्यात आला आहे. तात्पुरती उपाययोजना म्हणून अयोध्या नगरवासीयांसाठी एक कच्चा रस्ता तयार करण्यात आला असला तरी त्यावरही वाहतुकीचा ताण वाढल्याने गर्दी आणि कोंडी निर्माण होत आहे. रॉंग साईडने जाणाऱ्या वाहनांमुळे चौफुलीवर वारंवार ट्राफिक जाम होत असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.

आरोग्यविषयक आपत्कालीन प्रसंग, अंत्यविधीसाठी जाणाऱ्या वाहनांची ये-जा, तसेच दैनंदिन कामांसाठी शहरात जाणे या सर्व बाबी या वाहतूक कोंडीमुळे अधिकच अडचणीच्या झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून या प्रश्नावर सातत्याने मागणी होत असतानाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी अपेक्षित पाठपुरावा न केल्याचा आरोप मनसेने केला आहे. महापालिका व एमआयडीसी यांच्यात समन्वय साधून हा रस्ता तयार होऊ शकला असता, मात्र यासाठी कोणतीही तत्परता दाखवण्यात आलेली नाही, असेही सांगण्यात आले.

अजिंठा चौफुलीवर एसटी लक्झरी बस थांबत असल्याने अयोध्या नगरकडे वळणाऱ्या छोट्या वाहनांना जागा मिळत नाही आणि त्यामुळे रोजच वाद-विवादाचे प्रसंग उद्भवत आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने संयुक्तपणे पुढील १० दिवसांत ठोस निर्णय घेऊन समस्या सोडवावी, अन्यथा अयोध्या नगरवासीयांना सोबत घेऊन रास्ता रोको आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

हा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जळगाव महानगर उपाध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम तसेच शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांनी दिला आहे.


Protected Content

Play sound