
तेहरान-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा। अमेरिका-इस्रायलच्या संयुक्त हल्ल्यात इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्यानंतर इराणच्या सत्ताकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. देशाच्या सर्वोच्च नेतृत्वाची धुरा आता कोण सांभाळणार, याकडे जगाचे लक्ष लागले असताना ज्येष्ठ धर्मगुरू अयातुल्लाह अलीरेजा अराफी यांची अंतरिम सुप्रीम लीडर म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली आहे.

इराणची सरकारी वृत्तसंस्था ISNA ने दिलेल्या माहितीनुसार, नव्या सर्वोच्च नेत्याची औपचारिक निवड होईपर्यंत अराफी हे अंतरिम स्वरूपात जबाबदारी सांभाळतील. इराणच्या संविधानानुसार, सर्वोच्च नेत्याच्या निधनानंतर संक्रमणकालीन परिषद त्यांची सर्व कार्ये पार पाडते. या परिषदेत राष्ट्राध्यक्ष मसूद पेजेशकियन, मुख्य न्यायाधीश घोलाम-होसैन मोहसिनी-एजेई आणि गार्जियन कौन्सिलमधील एक धर्मगुरू यांचा समावेश असतो. अराफी यांची या परिषदेत विधी तज्ज्ञ म्हणून महत्त्वाची भूमिका निश्चित करण्यात आली असून देश सध्या राजकीय संक्रमणाच्या टप्प्यात आहे.
दरम्यान, लष्करी पातळीवरही मोठे बदल घडले आहेत. हल्ल्यांदरम्यान इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) चे प्रमुख जनरल मोहम्मद पाकपोर ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर अहमद वहीदी यांची IRGCचे नवे प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचे इराणी सरकारी माध्यमांनी जाहीर केले. पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.
अयातुल्लाह अलीरेजा अराफी यांचा जन्म 1959 साली इराणमधील यझ्द येथे झाला. शिया धर्मगुरूंमध्ये ‘अयातुल्लाह’ हा उच्च सन्मान त्यांना बहाल करण्यात आला आहे. ते अल-मुस्तफा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे माजी कुलपती राहिले असून मेयबोद आणि क़ोम येथे जुम्म्याचे इमाम म्हणून त्यांनी कार्य केले आहे. 2019 पासून ते गार्जियन कौन्सिलचे सदस्य आहेत. धार्मिक शिक्षण व्यवस्थेतील त्यांचा दीर्घ अनुभव आणि सांस्कृतिक क्रांतीच्या उच्च परिषदेतील सहभाग यामुळे त्यांना प्रभावी धार्मिक-राजकीय नेतृत्व मानले जाते.
अराफी आधुनिक तंत्रज्ञानाचे समर्थक मानले जातात. धार्मिक संस्थांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून इस्लामी सभ्यतेचा विकास साधता येऊ शकतो, असा त्यांचा दृष्टिकोन आहे. 2015 मध्ये त्यांनी असेंब्ली ऑफ एक्सपर्ट्सची निवडणूक लढवली होती, मात्र त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला. 2021 मध्ये ते या संस्थेवर सदस्य म्हणून निवडून आले.
इराणमध्ये सुरू असलेल्या राजकीय आणि लष्करी घडामोडींमुळे जागतिक पातळीवर चिंतेचे वातावरण आहे. नवीन सर्वोच्च नेत्याची निवड होईपर्यंत अराफी यांचे नेतृत्व देशाला स्थैर्य देऊ शकेल का, याकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष लागले आहे.



