अडावद (ता. चोपडा) – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । वन्यजीवांचे संवर्धन आणि पर्यावरणाचे संरक्षण याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण व्हावी या उद्देशाने अडावद येथील श्री संत सावता माळी शैक्षणिक व सामाजिक संस्था संचालित शामराव येसो महाजन विद्यालयात वन्यजीव सप्ताहानिमित्त वृक्षारोपणासह जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. १ ते ७ ऑक्टोबर दरम्यान साजऱ्या होणाऱ्या या सप्ताहाच्या प्रारंभी शाळा प्रांगणात वनविभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला.

या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक आर. के. पिंपरे होते. प्रमुख पाहुणे म्हणून वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे, वनपाल योगेश साळुंके, आर. एस. निकुंभे, वनरक्षक नवल चव्हाण, गजानन कायईगडे, वनमजूर राजू पाटील आणि सेवानिवृत्त वनमजूर दशरथ पाटील उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांना संबोधित करताना वनक्षेत्रपाल प्रशांत साबळे यांनी सातपुड्यात आढळणाऱ्या विविध वन्यप्राण्यांची माहिती दिली. मांडुळ, वाघ, हरिण यांसारख्या प्राण्यांची अंधश्रद्धेमुळे शिकार होणे ही गंभीर बाब असून अशा कृत्यांवर कायदेशीर कारवाई केली जाते, हे त्यांनी स्पष्ट केले.

साबळे यांनी वृक्षतोडीचे दुष्परिणाम समजावून सांगताना सांगितले की, निसर्गाचे संतुलन ढासळल्यामुळे ढगफुटी, पूर यांसारख्या नैसर्गिक आपत्ती वाढत असून त्याचा फटका मानवासोबतच वन्यप्राण्यांनाही बसतो. त्यामुळे वृक्षसंवर्धन करून अन्नसाखळीची साखळी टिकवणे अत्यावश्यक आहे.
वनपाल योगेश साळुंके यांनी मानवी वस्तीत वन्यप्राणी शिरल्यास त्यांना अन्न देणे टाळावे, कारण हा देखील एक वनगुन्हा असल्याचे सांगितले. जंगलातील अन्नसाखळी विस्कळीत झाल्यास बिबट्या, तडस यांसारखे प्राणी मानवी वस्तीकडे येऊ शकतात. त्यामुळे जंगलवाढ हा दीर्घकालीन उपाय असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या कार्यक्रमात इको क्लबच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. रोपे लावताना घ्यावयाची काळजी, पाणी व्यवस्थापन आणि देखभाल यासंदर्भात वनअधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, कर्मचारी आणि वनविभागाने विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन पि. आर. माळी यांनी केले. यावेळी वन्यजीव संरक्षण आणि वृक्षतोड थांबवण्याच्या संदर्भात कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास १९२६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले.



