Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरमध्ये जागतिक एड्स सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना जनजागृतीपर मार्गदर्शन

मुक्ताईनगरमध्ये जागतिक एड्स सप्ताहानिमित्त विद्यार्थ्यांना जनजागृतीपर मार्गदर्शन

0
108

मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । जागतिक एड्स सप्ताहाच्या अनुषंगाने विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल, मुक्ताईनगर येथे HIV जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम यांच्या मार्गदर्शनाखाली प्लॅन इंटरनॅशनल इंडिया चॅप्टर आणि जिल्हा एड्स नियंत्रण व प्रतिबंध विभाग, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला.

या कार्यक्रमात प्लॅन इंटरनॅशनल इंडिया चॅप्टरच्या वन स्टॉप सेंटरचे सेंटर मॅनेजर अल्केश वाघरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत HIV आणि AIDS यातील नेमका फरक सविस्तरपणे स्पष्ट केला. HIV संसर्ग होण्याची चार प्रमुख कारणे, त्यासंबंधी असलेले गैरसमज आणि अनावश्यक भीती यांचे शास्त्रीय पद्धतीने निरसन करण्यात आले. विद्यार्थ्यांमध्ये योग्य माहिती पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात आला.

कार्यक्रमादरम्यान STI अर्थात लैंगिक आजारांविषयी माहिती देत त्यांची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि आवश्यक काळजी याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. दैनंदिन जीवनात वैयक्तिक स्वच्छता तसेच परिसर स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. त्याचबरोबर TB, सिफिलिस, HCV आणि HBV यांसारख्या आजारांपासून बचाव करण्यासाठी कोणती खबरदारी घ्यावी, याचीही माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली.

यावेळी शासनाच्या HIV/AIDS संदर्भातील टोल फ्री हेल्पलाईन क्रमांक 1097 बाबत माहिती देऊन, गरज भासल्यास गोपनीय व मोफत समुपदेशन व तपासणी सेवांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले. तसेच यावर्षीच्या जागतिक एड्स दिनाचे ब्रीदवाक्य “अडथळ्यांवर विजय मिळवून, AIDS प्रतिसादाचे परिवर्तन” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.

वन स्टॉप सेंटरचे समुपदेशक मोहन महाजन यांनी Good Touch आणि Bad Touch या संकल्पना प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना समजावून सांगितल्या. सध्याच्या काळात मुलांमध्ये वाढत असलेल्या प्रसारमाध्यमांच्या गैरवापराचा त्यांच्या मानसिकतेवर होणारा परिणाम यावरही त्यांनी सखोल माहिती दिली.

कार्यक्रमाच्या शेवटी संदेशवहनामध्ये येणारे अडथळे खेळाच्या माध्यमातून स्पष्ट करण्यात आले. त्यानंतर शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून HIV जनजागृतीची शपथ घेण्यात आली आणि कार्यक्रमाची सांगता उत्साहात करण्यात आली.

या कार्यक्रमास शाळेचे मुख्याध्यापक नितीन पवार सर, मुख्याध्यापिका सरला पाटील मॅडम, मनीष चौधरी मॅडम, संजय राणे सर, भरत काळे सर, दिनेश शिवरामे सर, प्रफुल्ल मुंगे सर, राजेश सांगळकर सर, ॲडमिनिस्ट्रेटर लीना रडे, भारती सुरवाडे मॅडम, सविता महाजन मॅडम, लीना येवले मॅडम, ज्योती पाटील मॅडम यांच्यासह विद्यार्थी आणि सर्व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

एकूणच या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये HIV/AIDS बाबत वैज्ञानिक माहिती, सकारात्मक दृष्टिकोन आणि सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली असून, आरोग्यविषयक जनजागृतीसाठी हा कार्यक्रम अत्यंत उपयुक्त ठरल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.


Protected Content

Play sound