Home Cities मुक्ताईनगर मुक्ताईनगरात शिवप्रेमाचा जागर; विद्यार्थ्यांनी उलगडला शिवरायांचा पराक्रम

मुक्ताईनगरात शिवप्रेमाचा जागर; विद्यार्थ्यांनी उलगडला शिवरायांचा पराक्रम


मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । येथील जे. ई. स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त शिवगर्जना, पोवाडे, ऐतिहासिक वेशभूषा आणि प्रेरणादायी भाषणांनी भारलेला शिवजन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण परिसर शिवमय झाला होता.

१९ फेब्रुवारी हा दिवस महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचा असल्याने राज्यभर हा दिवस मोठ्या अभिमानाने साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर जे. ई. स्कूलमध्ये सकाळी ८.३० वाजता कार्यक्रमाची सुरुवात संस्थेचे सचिव डॉ. सी. एस. चौधरी, उपाध्यक्ष नारायण दादा चौधरी, संचालक महेश भाऊ पाटील आणि प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिवाजी महाराजांच्या आकर्षक मूर्तीचे पूजन आणि आरती करून करण्यात आली. यावेळी वातावरणात शिवभक्तीची भावना निर्माण झाली होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी एस. आर. ठाकूर यांनी प्रास्ताविकात शिवाजी महाराज जयंतीचे महत्त्व विशद करत हा दिवस केवळ सुट्टी नसून आपल्या रयतेच्या राजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस असल्याचे सांगितले. त्यानंतर शाळेच्या प्रांगणात आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात सुमारे ४० हून अधिक विद्यार्थ्यांनी गीत, पोवाडे, शिवगर्जना, शिवकाव्य आणि वक्तृत्व सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यार्थ्यांच्या प्रभावी सादरीकरणामुळे संपूर्ण परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले.

यावेळी काही विद्यार्थ्यांनी ऐतिहासिक वेशभूषा साकारून मराठा साम्राज्याचा इतिहास जिवंत केला. जान्हवी पाटील हिने माता जिजाऊंची भूमिका साकारून उपस्थितांची दाद मिळवली. देवेश्री पाटील हिने पोवाडा सादर करत महाराजांच्या पराक्रमाची गाथा उलगडली, तर शर्वरी पाटील हिने शिवगर्जना सादर करत वातावरण शिवमय केले.

संस्थेचे सचिव डॉ. सी. एस. चौधरी यांनी आपल्या मनोगतात शिवाजी महाराजांच्या कार्याचा आढावा घेत त्यांना आदर्श राजे म्हणून संबोधले. त्यांनी शिस्तबद्ध सैन्य, भक्कम गडकिल्ले आणि प्रजेच्या हिताची व्यवस्था निर्माण करून स्वराज्याची भक्कम पायाभरणी केली, असे त्यांनी सांगितले. प्राचार्य व्ही. एम. चौधरी यांनी आपल्या भाषणात शिवाजी महाराजांच्या स्वराज्य संकल्पनेवर आणि त्यांच्या उत्कृष्ट व्यवस्थापन कौशल्यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रशस्तीपत्र आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम. एम. पाटील मॅडम यांनी केले, तर पाहुण्यांचा परिचय आणि आभार एस. एस. कोलते मॅडम यांनी मानले.  कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 


Protected Content

Play sound