जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने यावल येथील जे. टी. महाजन सूतगिरणी आणि भुसावळ तालुक्यातील खडका येथील महाराष्ट्र सहकारी सूतगिरणीच्या लिलावाची प्रक्रिया सुरू केली असून याबाबतचे नोटिफिकेशन जारी करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील अनेक सहकारी संस्थांनी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून कर्ज घेऊन ते थकीत केले आहे. अशा संस्थांच्या मालमत्ता ताब्यात घेऊन त्यांच्या लिलावातून कर्ज व व्याजाची रक्कम वसूल करण्याचा निर्णय आधीच संचालक मंडळाने घेतला होता. या अनुषंगाने अलीकडेच फैजपूर येथील मधुकर सहकारी साखर कारखाना, कासोदा येथील वसंत सहकारी साखर कारखाना, यावल येथील जे.टी. महाजन सूतगिरणी आणि भुसावळ तालुक्यातील खडका येथील महाराष्ट्र सहकारी सूतगिरणी यांना जिल्हा बँकेने ताब्यात घेतले होते. यानंतर आता दोन्ही सुतगिरण्यांच्या लिलावाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
आज या संदर्भात जिल्हा बँकेने लिलावाची नोटीस जाहीर केली आहे. यात यावल येथील जे.टी. महाजन सूतगिरणी आणि सूतगिरणीच्या मालकीच्या जागेचा लिलाव करण्यात येणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सूतगिरणीवर ३१ मार्च २०२१ रोजी बँकेचे ४६ कोटी ५० लाख रूपये आणि नंतरचे व्याज बाकी आहे. सदर लिलावातून ही रक्कम वसूल करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या सूतगिरणीसाठी ८ जुलै २०२२ रोजी दुपारी १२ ते ४ या कालावधीत ई-ऑक्शनच्या माध्यमातून लिलाव होणार आहे. यात संपूर्ण मशिनरीसह सूतगिरणी व पडीत जागेचा लिलाव होणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, खडका येथील महाराष्ट्र सहकारी सूतगिरणीवर जिल्हा बँकेचे ३१ मार्च २०२१ रोजी ७ कोटी १६ लाख रूपयांचे कर्ज आहे. यासाठी सूतगिरणीच्या मालकीच्या ६.८६ हेक्टर जागेचा लिलाव करण्यात येत आहे. हा लिलाव ७ जुलै २०२२ रोजी दुपारी १२ ते ४ या कालावधीत ई-ऑक्शनच्या माध्यमातून होणार आहे.
जिल्हा बँकेच्या निर्णयामुळे यावल आणि खडका येथील सूतगिरण्यांचे इतिहासजमा होणार आहेत. तर यानंतर जिल्हा बँकेतर्फे मधुकर सहकारी साखर कारखाना विक्रीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.