यावल प्रतिनिधी । येथील बोगस शिक्षकेतर भरती प्रकरणी संबंधीतांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष अतुल पाटील यांनी दिली.
येथील बोगस शिक्षकेतर भरतीबाबत जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी जळगाव यांच्याकडे अतुल पाटील यांनी तक्रार केली होती. या अनुषंगाने माध्यमिक शिक्षणाधिकारी यांनी दिनांक सहा जुलै २०१९ रोजी भरती प्रक्रिया नियमबाह्य असून पदांना मान्यता देता येणार नाही असे शालेय समिती अध्यक्ष तथा सचिव असलेले मुख्याध्यापक श्री वाघ यांना लेखी स्वरूपात कळविले होते. असे असून देखील मुख्याध्यापक वाघ यांनी नियमबाह्य भरती केलेल्या दोन कर्मचार्यांचे मंजुरीचे प्रस्ताव उपसंचालक शिक्षण विभाग नाशिक यांच्याकडे पाठवलेले आहेत. संबंधीत भरती प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे शिक्षण विभागाने कळवून देखील मंजुरीसाठी प्रस्ताव पाठवणे म्हणजे शासनाची दिशाभूल करून फसवणूक करण्याचा हा प्रकार आहे यामध्ये भरती प्रक्रियेतील कर्मचार्यांनी नोकरी पोटी दिलेले पैसे परत मागू नयेत म्हणून केलेला हा खटाटोप आहे. सदर बाब गंभीर असून संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल व्हावेत म्हणून पाठपुरावा करणार असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक अतुल वसंत पाटील यांनी लाईव्ह ट्रेंड न्युज ला सांगीतले.
या बेकायदेशीर झालेल्या शिक्षकेतर कर्मचारी भरती प्रकरणी नगर परिषद व्दारे संचलीत साने गुरुजी माध्यमीक व उच्च माध्यमीक विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा शालेय समितीचे सचिव एस.आर. वाघ यांना महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपील १९७९च्या तरतुदीनुसार आपणावर शिस्तभंग विषयक कार्यवाही का करण्यात येवु नये ?याबाबत तीन दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याचे स्वतंत्र आदेश जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी दिले आहेत. या सर्व भरती प्रक्रियेत लाखो रुपयांचा आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा शहरातील शैक्षणीक क्षेत्रात होत आहे.