मुंबई (वृत्तसंस्था) विधानसभा निवडणुकीचे निकाल लागून १३ दिवस उलटून गेले तरी अद्याप कोणत्याही पक्षाने सत्ता स्थापनेचा दावा न केल्यामुळे राज्यात घटनात्मक पेचप्रसंग निर्माण झाला आहे. आता उद्या संध्याकाळपर्यंत सत्ता स्थापनेचा कुणीही दावा न केल्यास राज्यात राष्ट्रपती राजवट लागण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी राज्याच्या अॅटर्नी जनरलला राजभवनात चर्चेसाठी बोलावले आहे. अॅटर्नी जनरलच्या सल्ल्यानंतरच राज्यपाल त्यांची भूमिका स्पष्ट करणार आहेत.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अॅटर्नी जनरल आशुतोष कुंभकोनी यांना सल्लामसलतीसाठी राजभवनावर बोलावले होते. त्यानुसार कुंभकोनी राजभवनावर पोहोचले असून राज्यपालांसोबत त्यांची चर्चा सुरू आहे. येत्या ९ नोव्हेंबर रोजी विद्यमान विधानसभेचा कार्यकाल संपुष्टात येत आहे. त्याआधीच नवी विधानसभा अस्तित्वात येणे आवश्यक आहे. मात्र सत्तेचा दावा करण्यासाठी अवघा एक दिवस उरलेला असतानाही भाजप-शिवसेनेमधील घोळ मिटलेला नाही. उद्या संध्याकाळपर्यंत सत्तेचा दावा होणे अपेक्षित आहे. त्यामुळे अॅटर्नी जनरल व राज्यपालांच्या चर्चेकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे.