जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | चोपडा तालुक्यातील लोणी येथे गोवंश कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी गेलेल्या दोन गोरक्षकांवर अतिशय क्रूरपणे प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना गुरुवारी ११ डिसेंबर रोजी रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या या तरुणांवर सध्या जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या हल्ल्यात जामनेर तालुक्यातील ओझर येथील कृष्णा विठ्ठल भिल (वय १८) आणि जैनाबाद येथील योगेश दिलीप महाराज कोळी (वय ३५) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. कृष्णा भिल याला खात्रीशीर सूत्रांकडून लोणी गावात गोवंश कत्तल सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर कृष्णा, योगेश कोळी आणि त्यांचे तीन ते चार सहकारी तातडीने लोणी गावात पोहोचले.

घटनास्थळी पोहोचल्यावर या तरुणांनी बेकायदेशीर गोवंश कत्तलीला विरोध करण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथील स्थानिक कसाई लोकांनी त्यांच्यावर थेट हल्ला चढवला. सुरुवातीला शिवीगाळ करत मारहाण करण्यात आली. त्यानंतर काही हल्लेखोर धारदार शस्त्रे घेऊन आले. त्यांच्या हातात चॉपर, कोयते आणि लोखंडी दांडे होते.
या हल्ल्यात, कृष्णा भिल यांच्या मांडीवर चॉपरने अत्यंत गंभीर वार करण्यात आला, ज्यामुळे ते मोठ्या प्रमाणात रक्तबंबाळ झाले. तसेच, योगेश महाराज कोळी यांनाही लोखंडी दांड्यांनी मारहाण करण्यात आली, यात त्यांनाही मोठी दुखापत झाली आहे.
हल्ल्यानंतर दोन्ही जखमींना तातडीने जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आपत्कालीन विभागात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते आणि नागरिकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती, ज्यामुळे परिसरात काही काळ तणाव वाढला होता.
या प्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही अधिकृत तक्रार किंवा गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.



