मित्राचा वाद मिटविण्यासाठी गेलेल्या दोघा भावांवर प्राणघातक हल्ला : तिघांना अटक

337fbe80 43ca 41b2 859a 722e2df871af

जळगाव (प्रतिनिधी) मित्राचा वाद मिटविण्यासाठी मध्यस्थी करण्यास गेलेल्या भूषण कॉलनीतील राहूल सुरेश बोरसे (वय २६) आणि त्याचा मोठा भाऊ सुमित या दोघांवर पाच ते सहा तरुणांनी धारदार शस्त्राने प्राणघातक हल्ला केल्याची घटना काल (दि.१७) रात्री ११.१५ वाजता गांधीनगरात घडली. याप्रकरणी जिल्हापेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला असून दोन जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.

 

भूषण कॉलनीतील राहूल बोरसे याचा कॉलनीतीलच मित्र गणेश एकनाथ भोळे याचा १७ रोजी वाढदिवस होता. यानिमित्ताने राहूलसह त्याचा मोठा भाऊ सुमित व त्यांचे मित्र जमले होते. शतायू नावाच्या मित्राला रात्री १०.४५ च्या सुमारास देवेन मनोहर चौधरी याचा फोन आला. त्याने डॉ. नवाल हॉस्पिटलच्या गल्लीत दर्शन जैन यांच्याबरोबर भांडण झाल्याचे सांगितले. त्यानुसार राहूलसह सर्वजण देवेनकडे गेले आणि दर्शनचा शोध घेतला असता तो व त्याच्यासोबत पाच जण गिलोरी नावाचा खेळ खेळत होते. त्याच्या घरासमोर जावून देवेनला भांडणाचा जाब विचारला असता दर्शन आणि त्याच्यासोबत असलेल्या पाच जणांनी राहूल याच्या पाठीमागे उजव्या बाजूने तर त्याचा मोठा भाऊ सुमित याच्या छातीवर धारदार शस्त्राने वार केला व पसार झाले. त्यानंतर मित्रांनी दोघांना खाजगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. दोघांवर उपचार सुरु आहेत. याप्रकरणी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात राहूल बोरसे याच्या फिर्यादीवरुन दर्शन जैन याच्यासह पाच जणांविरोधात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयीत आरोपी चेतन अनिल भालेराव उर्फ माया (वय २१), आकाश प्रकाश सपकाळे (वय २१) व विजय देवेंद्र बावीस्कर (वय १९) तिघे रा. विवेकानंद नगर यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी गणेश नगरात सापळा रचून शिताफीने ताब्यात घेतले आहे. सदर आरोपींनी गुन्हयाची कबुली दिली असून त्यांना पुढील तपासकामी जिल्हापेठ पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक संदीप आराक करीत आहेत.

Add Comment

Protected Content