Home Cities जळगाव त्र्यंबकेश्वरमधील पत्रकार हल्ला निंदनीय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

त्र्यंबकेश्वरमधील पत्रकार हल्ला निंदनीय – पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
116

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । त्र्यंबकेश्वर येथे काही पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्या स्पष्ट शैलीत हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. तसेच, याच संवादात त्यांनी आमदार बच्चू कडू आणि रोहित पवार यांच्यावरही थेट निशाणा साधला.

गुलाबराव पाटील यांनी त्र्यंबकेश्वर येथील पत्रकारांवरील हल्ला हा अत्यंत निंदनीय प्रकार असल्याचे सांगत, “पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. त्याच्यावर हात उचलणं म्हणजे लोकशाहीवर आघात आहे. या घटनेची सखोल चौकशी करून पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे,” अशी ठाम भूमिका व्यक्त केली.

या पत्रकार परिषदेत त्यांनी आमदार बच्चू कडू यांच्या विधानांवरही प्रत्युत्तर दिले. पाटील म्हणाले, “बच्चू कडू आणि मी संघर्षातूनच पुढे आलो आहोत. ते म्हणतात मी शेतकऱ्यांचे प्रश्न मांडत नाही, तर हा त्यांचा गैरसमज आहे. त्यांनी माझ्या गावात घरी येण्याबाबत सांगितलं, तर मी म्हणतो—त्यांनी जरूर यावं. आम्हीही शेतकरीपुत्रच आहोत. ते कापसाचे, आम्हीही कापसाचे! ते माझ्यावर भाजपच्या जवळीकतेचा आरोप करतात, पण ते स्वतः काँग्रेसच्या पंजासोबत होते, हे विसरता कामा नये.”

याच संवादात पाटील यांनी बच्चू कडू यांना आपल्या खास खानदेशी शैलीत आमंत्रण देताना म्हटलं, “ते माझ्या घरी आले, तर चटणी-भाकर, नाश्ता, चहा देऊन त्यांचं स्वागत करेल!”

दरम्यान, राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित पवार यांच्या एका अधिकाऱ्यांवरील रोषपूर्ण वक्तव्यावरही पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. “रोहित पवार सध्या सत्तेबाहेर आहेत, त्यामुळे त्यांना चिडचिड होत आहे. पण युवा नेतृत्वाने असा उद्विग्नपणा दाखवणं योग्य नाही,” असा टोलाही गुलाबराव पाटील यांनी लगावला.


Protected Content

Play sound