जळगाव (प्रतिनिधी) पक्षांतर्गत वादातून कॉंग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अजबराव पाटील यांच्यावर १० ते १५ जणांनी हल्ला करत तोंडाला काळे फासण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार आज सकाळी जिल्हा कॉंग्रेस भवनात घडला आहे. या घटनेमुळे काही वेळ फुले मार्केट परिसरात प्रचंड घबराहटीचे वातावरण पसरले होते. दरम्यान, महिला शहरध्यक्षांचा पदभार काढल्याच्या प्रकरणातून हा हल्ला झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
या संदर्भात अधिक असे की, शहरातील कॉंग्रेस भवनाबाहेर ८ मार्च रोजी महिला आघाडीच्या शहराध्यक्ष अरुणा पाटील यांनी चक्क भिक मांगो आंदोलन करत कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले होते की, कॉंग्रेस भवनाबाहेर आधी काही दुकाने होती. कालांतराने ही दुकाने पाडल्यानंतर कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांनी कॉंग्रेस भवनाचा चहा-पाणीचा खर्च निघावा म्हणून काही विक्रेत्यांना कॉंग्रेस भवनात दुकाने दिली. भविष्यात संदीपभैय्या हे कॉंग्रेस भवन देखील भाड्याने देण्यास कमी करणार नाहीत. यासर्व गोष्टींच्या निषेधार्थ आपण आंदोलन करत असल्याचे सांगितले होते.
दरम्यान, या संदर्भात कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील यांनी अरुणा पाटील यांच्या आंदोलनामुळे पक्षाची बदनामी झाल्याचा अहवाल प्रदेश कमेटीला पाठविला होता. त्यानुसार काही दिवसानंतर महिला शहरअध्यक्षपदाचा पदभार सौ.पाटील यांच्याकडून काढून घेण्यात आला होता. याचाच राग धरून आज आपल्यावर अरुणा पाटील यांनी १० ते १५ गुंड आणत हल्ला केल्याचा आरोप अजबराव पाटील यांनी केला आहे. आज सकाळी साधारण ११ वाजेच्या सुमारास कॉंग्रेस भवनात हा खळबळजनक प्रकार घडला. घटनेची माहिती मिळताच जिल्हाध्यक्ष संदीपभैय्या पाटील,माजी खासदार उल्हास पाटील, राधेशाम तिवारी,माजी आमदार सुधीर तांबे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस स्थानक गाठत पोलीस निरीक्षक रविकांत सोनवणे यांची भेट घेत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत आहेत.
पहा : काँग्रेसचे सरचिटणीस अजबराव पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या हल्ल्याबाबतचा व्हिडीओ.