यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । किनगाव येथे बऱ्हाणपूर-अंकलेश्वर महामार्गावर असलेल्या स्टेट बँकेचे एटीएम नेहमीच बंद असते. त्यामुळे ग्राहकांना पैसे काढण्यासाठी मोठी गैरसोय होत आहे. किनगाव हे यावल तालुक्यातील सर्वात मोठे बाजारपेठेचे गाव असून येथे केळी, कापूस, कांदा आणि भुसार मालाचे मोठे व्यापारी आहेत. मंगळवारी येथे आठवडे बाजार आणि गुरांचा बाजार भरतो, ज्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार होतात. अशा वेळी व्यापारी आणि ग्राहकांना एटीएमची अत्यंत गरज भासते. मात्र, एटीएम मशीन बंद असल्याने त्यांना अडचणी येतात.
किनगाव आणि आसपासच्या १८ ते १९ गावांतील नागरिकांचे नियमित व्यवहार किनगावच्या बँकांमध्ये असतात. स्टेट बँकेत बहुतांश खातेदारांची खाती असल्याने बँकेत नेहमी मोठी गर्दी असते. बँकेने २० हजार रुपयांपर्यंतची रक्कम एटीएममधून काढण्याचा नियम केला आहे. मात्र, एटीएम मशीन बंद असल्याने पैसे काढण्यासाठी लोकांना बँकेत रांगेत उभे राहावे लागते, ज्यामुळे बँकेत आणखी गर्दी वाढते.
बँकेच्या बहुतेक खातेदारांना बँकेच्या वेळेव्यतिरिक्त पैसे काढण्यासाठी एटीएमचा उपयोग करावा लागतो. मात्र, अडचणीच्या वेळी एटीएम मशीन बंद असल्याने ग्राहकांना आपल्याच पैशांचा लाभ घेता येत नाही. कोणाला दवाखान्यासाठी किंवा महत्त्वाच्या कामासाठी पैसे लागल्यास एटीएम मशीन बंद दिसते, अशी तक्रार परिसरातील ग्राहक करत आहेत. स्टेट बँकेच्या अधिकाऱ्यांनी एटीएम मशीन सतत सुरू राहण्यासाठी कार्यवाही करावी आणि ग्राहकांना होत असलेल्या गैरसोयीपासून मुक्त करावे, अशी मागणी किनगाव आणि परिसरातील स्टेट बँकेच्या खातेदारांनी केली आहे.