जळगाव प्रतिनिधी | दोन वर्षांपासून पगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या मुलाला न्याय देण्यासाठी मुक्या बापाने फोडलेल्या आर्त टाहोने यंत्रणेला पाझर फुटला असून शिक्षण उपसंचालकांनी तत्काळ न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहेत.
कोरोनाच्या या कालखंडात अनेकांचा रोजगार गेला. काहीजण दोन वेळ जेवण्याचा प्रश्न कसा सोडवावा या विवंचनेत आहेत. काही ठिकाणी यातून लोकं सावरत आहेत तर काहीना अजूनही यातून सावरता येत नाहीये. रोजच्या जगण्याशी भिडत असतांना अनेक गोष्टींना सर्वसामान्यांना सामोरं जावं लागत आहे. मात्र प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहेत. परीक्षा घेणारी नियतीही कधीतरी झुकतं माप पदरात टाकते आणि आशेचा किरण दिसू लागतो. अशीच काहीशी घटना जळगावातील नाथवाडा येथे राहणाऱ्या राजेंद्र जोशी यांच्यासोबत घडली आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, राजेंद्र वामन जोशी हे शिपाई म्हणून कार्यरत असून २०१९ मध्ये जळगावातील नूतन मराठा महाविद्यालय येथून चोपडा तालुक्यातील हातेड येथील संस्थेच्या शिवाजी माध्यमिक विद्यालयात त्यांची बदली झाली. ते तिथे काम करायला लागले. मात्र तेथील मुख्याध्यापक यांनी २०१९ पासून आजपर्यंत त्यांना काहीच पगार दिला नाही. त्यांनी याबाबत अनेकवेळा तक्रारी केल्या मात्र जिल्हा प्रशासने या प्रकरणाची कुठलीच दखल घेतली नाही. माध्यमिक शिक्षण विभागाच्या अधिकारी कर्मचार्यांनी या तक्रारीकडे सपशेल दुर्लक्ष केलं. पगार मिळण्यासाठीचा लढा लढत असतांना नियतीने त्यांची परीक्षा घेणं सुरूच ठेवलं ते कॅन्सरने ग्रस्त झाले .
पगार होत नसल्याने गेल्या दोन वर्षांपासून विवंचनेत असतांना शिपाई म्हणून कार्यरत असलेल्या आपल्या मुलाला न्याय मिळावा, यासाठी वडील वामन जोशी यांनी गुरुवार, दि.९ डिसेंबर रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास जिल्हा परिषदेत शिक्षण उपसंचालकांची भेट घेतली. मुक्या असलेल्या जोशी यांनी हात जोडून हृदयाला पाझर फोडणारी विनंती केली आणि दोन वर्षांपासून तटस्थ असणारी यंत्रणा हलली. यावेळी शिक्षण उपसंचालकांनी त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
याविषयीची माहिती अधिकार कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांना कळाली आणि त्यांनी कॅन्सरपिडीत राजेंद्र जोशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढे सरसावले. ते राजेंद्र जोशी यांच्या मुक्या असलेल्या मळकटलेल्या कपड्यातल्या वडिलांना सोबत घेत जिल्हा परिषदेत गेले. आणि योगायोगाने शिक्षण उपसंचालक नितीन उपासनी हे जिल्हा परिषदेत वार्षिक तपासणी निमित्ताने आले होते. आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी मुक्या बापाने शिक्षण उपसंचालकांकडे हात जोडून विनंती केली. “शब्दाविन संवादू” या त्यांच्या भावनेने व्यक्त झालेल्या टाहोने शिक्षण उपसंचालकांनाही गलबलून आले. त्यांनी लागलीच याप्रकरणात शिक्षणाधिकार्यांना संबंधित कार्यवाही करण्याचे आदेश देत न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. याप्रकारे उपशिक्षक नरेंद्र साहेबराव पाटील यांच्याही प्रलंबित असलेल्या अर्जावर कार्यवाही करण्याचे आश्वासन शिक्षण उपसंचालकांनी यांनी दिले. यावर आता शिक्षण उपसंचालक काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.