मुंबई – मराठवाड्यातील शेतकर्यांचे अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले असून, त्यांना मदत करण्याबाबत शासनाकडून प्रचंड उदासिनता दाखविली जात आहे. वेगाने पंचनामे करून तत्काळ मदत शेतकर्यांना द्यावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.
याबाबत मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, जालन्यात मोसंबीचे नुकसान, सावरगाव, भिलपुरी, मौजपुरी, माणेगाव, नसडगाव आणि इतरही तालुक्यांमध्ये मूग, उडीद, सोयाबीन इ पिकांचे नुकसान, परभणीत अजूनही शेतात पाणी आहे. काही शेतकऱ्यांनी माल शेतात काढून ठेवल्याने मुगाला तर शेतातच कोंब फुटले. हीच स्थिती मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये आहे. मराठवाड्यात घरांचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी पूर्णपणे खचला आहे असं त्यांनी सांगितले.
तसेच केवळ मंत्र्यांनी दौरे करायचे आणि पंचनाम्याचे आदेश दिले आहोत असं सांगून मोकळे व्हायचं, असे करून चालणार नाही. सरकारचे प्रमुख म्हणून जागोजागी पंचनामे होत आहेत की नाही, प्रत्यक्ष जमिनीवर काय स्थिती आहे याकडे अधिक कटाक्षाने लक्ष देण्याची गरज आहे. आधीच कोरोनाचे संकट आणि त्यात सातत्याने हे अस्मानी संकट त्यामुळे मानसिकदृष्ट्या तो खचला आहे. याचवेळी त्याच्या पाठिशी सरकार म्हणून ठामपणे उभे राहण्याची गरज आहे. त्याला तातडीने मदत करण्याची गरज आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रात मागणी केली आहे.