नवी दिल्ली-वृत्तसेवा । निवडणूक आयोगाने रविवारी आसाम, केरळ, पुदुच्चेरी, तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची अधिकृत घोषणा केली. या निवडणुकांसाठी मतदानाची प्रक्रिया ९ एप्रिलपासून सुरू होणार असून सर्व राज्यांचे निकाल ४ मे रोजी जाहीर केले जाणार आहेत. निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच संबंधित राज्यांमध्ये आचारसंहिता तात्काळ लागू झाली आहे.
निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, केरळ, आसाम आणि पुदुच्चेरी या तीन राज्यांमध्ये ९ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान होईल. तामिळनाडूमध्ये २३ एप्रिल रोजी एकाच टप्प्यात मतदान घेण्यात येणार आहे. पश्चिम बंगालमध्ये मात्र दोन टप्प्यांत मतदान होणार असून २३ एप्रिल आणि २९ एप्रिल या दिवशी मतदार आपला हक्क बजावतील.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितले की, या पाच राज्यांमध्ये आणि एका केंद्रशासित प्रदेशात मिळून एकूण १७.४ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या निवडणुकांमध्ये एकूण ८२४ विधानसभा जागांसाठी मतदान होणार आहे. लोकशाहीच्या या मोठ्या प्रक्रियेसाठी निवडणूक आयोगाने व्यापक तयारी केली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मतदार यादीतील पारदर्शकता वाढवण्यासाठी आयोगाने काही महत्त्वाचे उपक्रम हाती घेतले असल्याची माहितीही त्यांनी दिली. यामध्ये ‘SIR’ (Special Intensive Revision) या उपक्रमाचा समावेश असून याच्या माध्यमातून मतदार यादीत अपात्र व्यक्तींचा समावेश होऊ नये यासाठी विशेष पडताळणी करण्यात येत आहे. तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान शिस्त राखण्यासाठी मतदान केंद्राबाहेर मोबाईल फोन जमा करणे अनिवार्य करण्यात आले आहे. मतदारांनी मतदान केल्यानंतर आपले मोबाईल परत घेता येणार आहेत.
दरम्यान, २०२१ मध्ये या पाच राज्यांच्या निवडणुकांची घोषणा २६ फेब्रुवारी रोजी करण्यात आली होती. त्या वेळी पश्चिम बंगालमध्ये तब्बल आठ टप्प्यांत मतदान पार पडले होते, तर आसाममध्ये तीन टप्प्यांत निवडणूक झाली होती. तामिळनाडू, केरळ आणि पुदुच्चेरीमध्ये मात्र एकाच टप्प्यात मतदान घेण्यात आले होते.
या सर्व राज्यांच्या विधानसभांची मुदत मे महिन्यात संपुष्टात येत असल्याने निवडणूक आयोगाने वेळेत निवडणूक प्रक्रिया जाहीर केली आहे. त्यामुळे येत्या काही आठवड्यांत या राज्यांमध्ये राजकीय प्रचाराला जोर चढण्याची शक्यता आहे.



