काहीही कारण नसतांना तरुणावर हल्ला; चार जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील हरीविठ्ठल नगरात शनिवारी, ११ जानेवारी रोजी रात्री ८.३० वाजता एका ४४ वर्षीय व्यक्तीला चार जणांनी विनाकारण हल्ला करून गंभीर दुखापत केल्याची घटना घडली. भरत जगन सोनवणे यांना संशयित आरोपींनी शिवीगाळ करत रस्त्यावरील दगड डोक्यात मारून जखमी केले. या घटनेनंतर रात्री ११ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक असे की, हरीविठ्ठल नगरातील लाकडी वखारीजवळ भरत सोनवणे उभे असताना, पप्पू शंकर कोकाटे, किरण शंकर कोकाटे (दोघेही रा. तडवी गल्ली, हरीविठ्ठल नगर) आणि दोन अनोळखी व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केला. आरोपींनी भरत सोनवणे यांना विनाकारण लाथ मारून गटारीत ढकलले. त्यानंतर रस्त्यावर पडलेल्या दगडाने डोक्यात हल्ला केला, ज्यामुळे त्यांना गंभीर दुखापत झाली.

हल्ल्यानंतर भरत सोनवणे यांना तत्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. त्यांनी दिलेल्या फिर्यादीच्या आधारे, संशयित आरोपी पप्पू आणि किरण कोकाटे तसेच दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार, या प्रकरणाचा तपास पोहेकॉ प्रविण जगदाळे करत आहेत.

Protected Content