चाळीसगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । चाळीसगाव शहरातील आनंदवाडी येथील समाज मंदिराजवळ जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला तलवार व कोयताने वार करून गंभीर जखमी करत प्राणघातक हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवार २६ ऑक्टोबर रोजी चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या संदर्भात माहिती अशी की, अजय नाना पवार (वय-२८) रा.आनंदवाडी, समाज मंदिर जवळ चाळीसगाव हा आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंडप डेकोरेटरचे काम करून आपला उदरनिर्वाह करतो. दरम्यान जुन्या भांडणाच्या कारणावरून आणि पोलिसात तक्रार दिल्याच्या कारणावरून अजय पवार याला संशयित आरोपी मालजी उर्फ काका घोडे, रितेश मालजी घोडे, तुषार उर्फ चोंग्या जाधव, भोला अजबे, ऋषिकेश उर्फ मायकल पाटील सर्व रा.चाळीसगाव आणि यांच्यासह सह इतर दोन ते तीन अनोळखी व्यक्ती यांनी हातात तलवार व कोयता घेऊन अजय पवार यांच्यावर प्राणघातक हल्ला चढविला.
यात अजय पवार यांच्या कमरेला, पाठीवर वार करून गंभीर दुखापत केली तर इतरांनी लाथा बुक्क्यांनी जेवे ठार मारण्याचा प्रयत्न केला हा प्रकार घडल्यानंतर जखमीला तातडीने चाळीसगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान अजय पवार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी विरोधात चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बिरारी करीत आहे.