जळगाव प्रतिनिधी । अवैधंद्याची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी छापा टाकल्याने तो राग मनात ठेवून तरूणाच्या राहत्या घरात जावून जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. याप्रकरणात अद्यापपर्यंत पोलिसांनीही जीवघेणा हल्ल्ह्याचे कलम लावलेले नाहीत. या गुन्ह्यात रामानंदनगर पोलीस कर्मचारी संशयितांना वाचविण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पराग कोचुरे यांनी आयोजित पत्रकार परिषदेत केला आहे.
ते म्हणाले की, शहरातील शामनगर येथे शुभम विनोद कोचुरे रा. शामनगर, हा त्याची आई अलका कोचुरे यांच्यासोबत राहतो. गट नंबर प्रिंपाळा शिवार येथे कोचुरे यांचा कोंबडी फार्म आहे. या फार्म जवळ राजश्री राजू देशमुख हे कुटुंबासह वास्तव्यास आहेत. देशमुख यांच्या घरासमोर सुरु असलेल्या अवैध धंद्याची देशमुख यांनी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला होता. कारवाई झाल्याच्या रागातून दत्तू कोळी, विक्की कोळी व भरत सपकाळे या तिघांनी ८ ऑगस्ट रोजी राजश्री देशमुख यांना शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली होती. याप्रकरणी रामानंदनगर पोलिसात अदखलपात्र तक्रार दाखल आहे. याच तक्रारी शुभम कोचुरे हे साक्षीदार असल्याने दत्तू कोळी, विक्की कोळी व भरत सपकाळे यांच्यासह १० ते १२ जणांनी लाकडी काठ्या, लोखंडी रॉड घेवून शुभम कोचुरे यांच्या घरावर हल्ला केला. घरातील टीव्ही फ्रीजसह दुचाकी व इतर वस्तूंची तोडफोड करत शुभमला लोखंडी रॉडने मारहाण करुन गंभीर दुखापत केली. तर शुभम यांची आई अलका हिलाही संबंधितांनी मारहाण करुन तिच्या गळ्यातील ५० ग्रॅम वजनाची सोन्याची माळ व १० ग्रॅम वजनाचे कर्णफुल या दागिण्याचे तुटून पडून नुकसान झाले होते. विनोद कोचुरे यांनी पत्नी अलका व मुलगा शुभम यास रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान शुभम हा गंभीर जखमी असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून अद्यापही बेशुध्द आहे.
याप्रकरणी गुन्हा दाखल करावा यासाठी रामानगर पोलिसांनी टाळाटाळ केली. त्यामुळे जिल्हाधिकारी यांना संपर्क साधला, त्यानंतर पोलीस उपअधीक्षकांना संपर्क केल्यानंतर रात्री रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल झाला. ४० तास उलटूनही अद्याप पोलिसांनी घराचा पंचनामा केला नाही, तसेच प्राणघातक हल्ला असतांना, केवळ मारहाणीचे कलम लावले. ८ ऑगस्ट रोजी मारहाणीदरम्यान देशमुख, तसेच शुभम कोचुरे यांना दत्तू कोळी, विक्की कोळी व भरत सपकाळे यांनी धमकी दिली असल्याचेही पराग कोचुरे यांनी सांगितले. गुन्ह्यात प्राणघातक हल्लयाचे कलम वाढवून संशयितांना अटक होवून त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
https://www.facebook.com/508992935887325/videos/290628836155797