मुंबई वृत्तसंस्था । मुंबई मेट्रो रेल्वे कार्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालिका अश्विनी भिडे यांची प्रधान सचिवपदी बढती देण्यात आली आहे. यासोबतच त्या मेट्रो ३च्या व्यवस्थापकीय संचालिका म्हणूनही कार्यभार पाहणार आहेत. उद्यापासून (बुधवार) त्या प्रधान सचिवपदाची सूत्र हाती घेणार आहेत. भिडे यांच्या कामाचा आलेख पाहिला तर आधी एमएमआरडीए आणि आता एमएमआरसी मधल्या जबाबदाऱ्या ठळकपणे उठून दिसतात.
प्रशिक्षणानंतर अश्विनी भिडे यांचं पहिलं पोस्टिंग इचलकरंजी येथे करण्यात आलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी साहाय्यक जिल्हाधिकाऱ्याची जबाबदारी पार पाडली. तिथं कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न होते. पण त्यांनी ते कौशल्यानं हाताळले. विभागीय आयुक्त अरूण भाटीया यांनीदेखील त्यांच्या कामाचं कौतुक केलं होतं. नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी असताना त्यांनी विकासकामांवर भर दिला. कमी खर्चात सूक्ष्म जलसिंचन करणारे रानजाई पद्धतीचे बंधारे उभारण्यावर त्यांनी भर दिला. त्याला चांगलं यशदेखील मिळालं होतं. खात्यामध्ये गैरप्रकार करणाऱ्या इंजिनीयरवरही त्यांनी कारवाई केली होती. २०१४-१५ या एका वर्षांत शिक्षण खात्याच्या सचिव पदाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली होती.