तरूणाने टोकाचा निर्णय घेतल्याने कुटुंबियांनी फोडला हंबरडा !

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गणेश कॉलनीत राहणाऱ्या एका तरूणाने राहत्या घरात छताला गळफास लावून घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवार २० मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. या घटनेप्रकरणी जिल्हापेठ पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सनी ईश्वरलाल केसवानी (वय ३६, रा.गणेश नगर, जळगाव)असे मयत उद्योजकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सनी ईश्वरलाल केसवानी हा तरूण आपल्या कुटुंबासह गणेश कॉलनी परिसरात वास्तव्याला होता. जळगाव एमआयडीसी येथे त्याची स्वतःची कंपनी आहे. त्यानुसार तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. सनी केसवानी यांची पत्नी माहेरी गेली होती. सोमवारी २० मे रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास घरी तो एकटाच होता. यावेळी त्याने छताला गळफास लावून आत्महत्या केली.

दरम्यान शेजारच्या नागरिकांना माहिती समजताच त्यांनी त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सनी केसवानी यांना तपासून वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहल दुगड यांनी मयत घोषित केले. आत्महत्या करण्याचे कारण समोर आलेले नाही. यावेळी कुटुंबीयांनी एकच हंबरडा फोडला. जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला अकस्नात मृत्यूची नोंद करण्याचे काम सुरू होते. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. तरुण उद्योजकाच्या मृत्यूमुळे शासकीय रुग्णालयात अनेक व्यापारी, उद्योजकांनी गर्दी केली होती.

Protected Content