बारामती – वृत्तसेवा । बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणूक सुरुवातीला बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात असताना आता या निवडणुकीने अनपेक्षित आणि रंगतदार वळण घेतले आहे. महायुतीकडून सहानुभूतीच्या लाटेवर विजय निश्चित मानला जात असतानाच तब्बल 55 उमेदवार रिंगणात उतरल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत.
अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबातील सुनेत्रा पवार यांना सहानुभूती मिळेल आणि निवडणूक सहज पार पडेल, असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र प्रत्यक्षात अनेक अपक्षांसह विविध पक्षांचे उमेदवार मैदानात उतरल्याने ही निवडणूक आता अत्यंत चुरशीची ठरणार आहे. काँग्रेसने आकाश मोरे या धनगर समाजातील उमेदवाराला मैदानात उतरवून सामाजिक समीकरणांवर भर दिल्याचे स्पष्ट झाले आहे.

या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. राज्यसभा खासदार पार्थ पवार यांच्यासह झालेल्या या भेटीत फडणवीस यांनी भाजप ‘मोठा भाऊ’ म्हणून सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वास दिला. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
सुनेत्रा पवार यांनी 6 एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला असून अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीतील राजकीय वारसा कायम राखण्यासाठी त्यांनी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा देत राज्यात उपमुख्यमंत्रीपद स्वीकारले होते. त्यानंतर त्यांनी बारामतीतील रिक्त जागेसाठी पोटनिवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला.
या निवडणुकीत एकूण 55 उमेदवार रिंगणात असून त्यामध्ये करुणा मुंडे तसेच ‘बिग बॉस’मधून चर्चेत आलेले अभिजित बिचुकले यांचाही समावेश आहे. त्यामुळे मतदारसंघात उत्सुकता आणि चर्चा वाढली आहे. काँग्रेसच्या सहभागामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात नाराजीची लाट उसळली असून पार्थ पवार यांनी काँग्रेसवर टीका करत ‘ही त्यांच्या अधोगतीची सुरुवात आहे’ असे विधान केले. या वक्तव्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.
बारामती पोटनिवडणुकीसाठी येत्या 23 एप्रिल रोजी मतदान होणार असून 4 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. मोठ्या संख्येने उमेदवार आणि बदलती राजकीय समीकरणे यामुळे ही निवडणूक राज्याच्या राजकारणात विशेष लक्षवेधी ठरणार आहे.



