Home क्राईम सराफाचे सोने घेऊन पळून गेलेल्या कारागिराला ८ वर्षांनी ठोकल्या बेड्या !

सराफाचे सोने घेऊन पळून गेलेल्या कारागिराला ८ वर्षांनी ठोकल्या बेड्या !


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील एका सराफा व्यावसायिकाचे सुमारे ३० तोळे (१०० ग्रॅम) सोने घेऊन फरार झालेल्या बंगाली कारागिराला जळगाव पोलीस दलाच्या विशेष पथकाने तब्बल आठ वर्षांच्या अथक शोध मोहिमेनंतर उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून अटक केली आहे. आरोपीकडून चोरी झालेले सोने हस्तगत करण्यात आले असून, जळगावच्या गुन्हे शाखेच्या या कामगिरीमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सुशांत कुंडू असे आहे. शहरातील एका प्रसिद्ध सराफा व्यावसायिकाने दागिने बनवण्यासाठी सुशांत कुंडू या कारागिराकडे सुमारे ३० तोळे सोने दिले होते. मात्र, संधी साधून सुशांत कुंडू हा कारागीर हे सर्व सोने घेऊन २०१४ च्या सुमारास अचानक पसार झाला. या घटनेनंतर सराफा व्यावसायिकाने शनिपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून पोलीस त्याचा कसून शोध घेत होते.

गेली आठ वर्षे पोलीस या गुन्ह्याचा तपास करत असताना, गुप्त माहितीच्या आधारे सुशांत कुंडू हा उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे आपले नाव बदलून आणि ओळख लपवून राहात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव पोलीस दलाचे एक विशेष पथक तातडीने वाराणसीकडे रवाना झाले. तेथे स्थानिक पोलिसांच्या मदतीने बुधवारी (२२ ऑक्टोबर) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आरोपी सुशांत कुंडूला अटक करण्यात आली. जळगाव पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीकडून चोरी केलेले १२ लाख रुपये किमतीचे १०० ग्रॅम (सुमारे ३० तोळे) सोने जप्त केले आहे. आरोपी सुशांत कुंडूला जळगाव येथे आणण्यात आले आहे. पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound