सोनभद्र, प्रतिनिधी | जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० लोकशाही मार्गाने हटविण्यात आले नाही, हे कलम हटवण्याची सरकारची पद्धत असंवैधानिक आहे,’ अशी टीका प्रियांका गांधी यांनी आज (दि.१३) येथे केली आहे.
उत्तर प्रदेशातील सोनभद्र जिल्ह्यातील उम्मा गावात जमिनीच्या वादातून झालेल्या हत्याकांडातील पीडित कुटुंबीयांना भेटण्यासाठी प्रियांका गांधी आज आल्या होत्या. यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी सरकारवर हा आरोप लावला. सरकारने ३७० कलम हटविताना लोकशाही मार्गाचा अवलंब केला नाही. त्यामुळे सरकारचा हा निर्णय संविधान विरोधी आहे. अशा गोष्टी करताना नियम आणि कायद्यांचे पालन करावे लागते. नेमके तेच या सरकारने केलेले नाही, असेही त्या म्हणाल्या. प्रियांका यांनी उम्मा गावात जावून मृतांच्या नातेवाईकांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली.
दरम्यान, उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री दिनेश शर्मा यांनी प्रियांका यांची सोनभद्रमधील भेट ही राजकीय स्टंट असल्याचे म्हटले आहे. सोनभद्रमध्ये जे हत्याकांड झाले त्याचे त्याला खऱ्या अर्थाने काँग्रेसच जबाबदार आहे. काँग्रेसच्या जुन्या नेत्यांच्या कर्मांमुळेच आज ही परिस्थिती पहायला मिळाली आहे. त्यामुळे प्रियांका यांनी सोनभद्रला जाऊन जुन्या काँग्रेस नेत्यांनी केलेल्या पापांचे प्रायश्चित केले पाहिजे, अशी टीका शर्मा यांनी केली.