अमळनेर (प्रतिनिधी) ‘पाणी हे जीवन आहे’ असे नेहमी म्हटले जाते आणि ते मान्यही करावे लागते. सध्या आपण पाहतोय की, सगळीकडे पाण्याची खूप मोठी समस्या निर्माण झाली आहे. धरणगाव येथील कलाशिक्षक परमेश्वर रोकडे हे पाण्याबाबत जनजागृतीचे काम सातत्याने करत असतात.
आतापर्यंत त्यांनी लोकसंख्या, शिक्षणाचे महत्त्व, प्रदूषण, वृक्ष लागवड, बेटी बचाव व पाणी वाचवा अशा अनेक विषयांवर त्यांच्या चित्रांच्या व फलक लेखनाच्या माध्यमातून प्रबोधनाचे काम केले आहे. सोबतच्या चित्रात त्यांनी ‘एक थेंब पाण्याचा, प्रश्न अनेक जीवांचा’ या अर्थपूर्ण घोषवाक्यामधून सोबत चित्रांची जोड देऊन मानवाला ‘पाण्याचे मोल अनमोल’ असे स्पष्ट केले आहे. शेवटी त्यांच्या धडपडीतून हेच समजते की, मानवाने वेळीच पाण्याचे योग्य नियोजन केले तर भविष्यात पाण्याची समस्या उद्भवणार नाही आणि पुन्हा आपल्या स्वप्नातला नवभारत पाहायला मिळेल. हे मात्र त्यांच्या चित्रातून स्पष्ट जाणवते.