धानोरा-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । झि.तो. महाजन माध्यमिक व ना.भा. पाटील ज्युनिअर कॉलेज, धानोरा येथे गणेश चतुर्थी निमित्ताने विद्यार्थ्यांनी बनविलेल्या शाडू मातीच्या गणरायाचे पारंपरिक पद्धतीने स्वागत करून विधिवत स्थापना करण्यात आली. सालाबादप्रमाणे साजरा होणाऱ्या या उपक्रमात यंदा अधिक उत्साह, पर्यावरणपूरकता आणि समाजप्रबोधन यांचा समावेश होता. विद्यार्थ्यांच्या सहभागातून घडलेल्या या उपक्रमाने परिसरात एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा निर्माण केली.

या उपक्रमात इयत्ता १० वी च्या सर्व विद्यार्थ्यांना गणेश मूर्ती स्थापन करण्याचा मान देण्यात आला. शाळेच्या मैदानावरून ढोल-ताशांच्या गजरात, लेझीम पथकाच्या निनादात आणि पारंपरिक पोशाख परिधान केलेल्या विद्यार्थ्यांच्या सहभागात गणरायाची मिरवणूक काढण्यात आली. बालचिमुकल्यांनी साकारलेल्या विठ्ठल-रुक्मिणीच्या वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. शालेय समिती सदस्य भाऊसाहेब सागर चौधरी व सौ. अर्चना चौधरी मॅडम यांच्या हस्ते मूर्तीची प्रतिष्ठापना झाली.

विद्यालयातील हरितसेना विभागाच्या पुढाकाराने पर्यावरणपूरक शाडू मातीपासून गणपती बनविण्याचा उपक्रम राबविण्यात आला. मूर्तिकार विशाल कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी स्वतः मूर्ती तयार करून ती रंगविली. हा उपक्रम शालेय स्तरावर पर्यावरण जागृतीचा उत्तम नमुना ठरला. केवळ मूर्ती तयार करणेच नव्हे, तर त्यासोबत विद्यार्थ्यांनी परिसरात सामाजिक संदेश देणारी चित्रे व भित्तीपत्रके रंगवली.
या उपक्रमात पंढरपूर वारीचे सुंदर डेकोरेशन साकारण्यात आले. नैसर्गिक साहित्याचा वापर करून पर्वतरांगा, गावे, रस्ते, आणि संतांचे कार्य दर्शवणारे संदेश भिंतींवर सजविण्यात आले. विद्यार्थ्यांच्या कल्पनाशक्तीचा उत्कृष्ट आविष्कार यामध्ये दिसून आला. या कलाकृतींमधून केवळ धार्मिक भावना व्यक्त झाल्या नाहीत, तर पर्यावरण, स्वच्छता व संतपरंपरेचे मूल्यही प्रभावीपणे समोर आले.
विद्यार्थ्यांच्या या अभूतपूर्व सहभागाचे व कौशल्याचे विद्यालयाचे चेअरमन भाऊसो श्री प्रदीप महाजन, ज्येष्ठ संचालक दादासो बी.एस. महाजन, तात्यासो वामनराव महाजन, भाऊसाहेब योगेश पाटील, सागर चौधरी, अनिल महाजन, व्ही.सी. पाटील, प्राचार्य के.एन. जमादार, उपमुख्याध्यापक एस.पी. महाजन, पर्यवेक्षक एल.डी. पाटील आणि सर्व शिक्षक-शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकांनी मन:पूर्वक अभिनंदन व कौतुक केले.



