यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वैजापूर वनक्षेत्रात वनविभागाच्या गस्तीदरम्यान दुर्मिळ स्थलांतरित पक्ष्यांची नोंद करण्यात आली आहे. Ruddy Shelduck (चक्रवाक) व Lesser Whistling Duck या पक्ष्यांना येथे पाहण्याचा आनंद पक्षी निरीक्षकांना मिळाला. हे पक्षी हिवाळ्यात स्थलांतर करत भारतात येत असतात आणि यामुळे जैवविविधतेच्या दृष्टीने हा महत्त्वाचा नोंदवही घटक ठरतो.
चक्रवाक हा सुमारे 66 सें.मी. आकारमानाचा आकर्षक पक्षी आहे. नर चक्रवाक केशरी-बदामी रंगाचा असून त्याच्या डोक्याचा व मानेचा रंग फिकट असतो. त्याच्या मानेभोवती काळ्या रंगाचा कंठ असतो, तर पंखांवर काळेपांढरे आणि हिरवे पट्टे आढळतात. मादी नरासारखीच असते, पण तिचे रंग थोडे फिकट असतात व मानेभोवती काळा कंठ नसतो.
चक्रवाक हा भारतात हिवाळ्यात आढळणारा स्थलांतरित पक्षी आहे. तो भारतासह बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार, चीन आणि आफ्रिकेतील इथियोपियामध्येही आढळतो. विशेषतः तलावांच्या किनाऱ्यावर लहान गटात किंवा जोडीने विहार करणारा हा पक्षी आता संकटग्रस्त यादीत समाविष्ट झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील हतनूर जलाशय (IBA – Important Bird Area) येथे यापूर्वीही या पक्ष्यांची नोंद झाली आहे. Lesser Whistling Duck हा मुख्यतः लहान तळ्यांजवळ राहणारा पक्षी आहे. त्यांचा आवाज संथ आणि संगीतमय असतो. झाडांच्या ढोलीत किंवा जमिनीवर ते घरटे तयार करतात.
हे स्थलांतरित पक्षी 6000 ते 7000 फूट उंचीवर उड्डाण करत वेगवेगळ्या ठिकाणी जात असतात. सध्या हा पक्षी एक महिना वैजापूर वनक्षेत्रात वास्तव्य करणार असल्याने पक्षीप्रेमींना त्यांचे निरीक्षण करण्याची उत्तम संधी आहे. या निरीक्षण मोहिमेत यावल वनविभागाचे उपवनसंरक्षक, सहाय्यक वनसंरक्षक (चोपडा) आणि वनपरिक्षेत्र अधिकारी (वैजापूर) यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच निरीक्षण करताना वनरक्षक संदीप भोई, विवेक पावरा, गणेश बारेला, जुबेर तडवी आणि समीर तडवी उपस्थित होते.