भुसावळ (प्रतिनिधी) रेशन दुकानदाराकडून दीड हजाराची लाच स्वीकारतांना पुरवठा अधिकारी रवींद्र विनायक तारकर याला लाच लुचपत विभागाच्या पथकाने आज दुपारी रंगेहाथ अटक केल्यामुळे महसूल विभागात प्रचंड खळबळ उडालेली आहे.
या संदर्भात अधिक असे की, रेशन दुकान चालविण्यासाठी दरमहा दीड हजार रुपयांचा हप्ता मिळण्याची मागणी भुसावळ तहसील कार्यालयातील पुरवठा अधिकारी रवींद्र विनायक तारकर याने एका दुकानदाराकडून केली होती. या संदर्भातील तक्रारीची खात्री होताच जळगाव एसीबीच्या पथकाने आज (सोमवार) दुपारी साडेपाच वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात सापळा रचला. त्यानंतर लाच स्वीकारतांना रवींद्र तारकर या पुरवठा अधिकाऱ्यास रंगेहाथ अटक केली. ही कारवाई जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात अधिकारी व कर्मचार्यांनी केली. दरम्यान, मागील काही दिवसांपासून रावेर रेशन घोटाळा गाजत असतांना आज हा प्रकार घडल्यामुळे तहसील कार्यालयातील अधिकारी, कर्मचार्यांमध्ये मोठी खळबळ उडाली होती.