Home क्राईम ‘फरार आरोपीला अटक करा, कठोरात कठोर शिक्षा करा’ : बिलवाडी येथील ग्रामस्थांचे...

‘फरार आरोपीला अटक करा, कठोरात कठोर शिक्षा करा’ : बिलवाडी येथील ग्रामस्थांचे रास्ता रोको आंदोलन !

0
169


जळगाव-लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव तालुक्यातील बिलवाडी गावात जुन्या वादातून दोन कुटुंबांमध्ये झालेल्या तुंबळ हाणामारीत एकनाथ निंबा गोपाळ (वय-५५) यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी सर्व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी आणि फरार आरोपीला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी मयत एकनाथ गोपाळ यांच्या कुटुंबीयांनी सोमवारी सकाळी आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. पोलीसांनी दिलेल्या आश्वासनानंतर रास्तारोको आंदोलन मागे घेण्यात आले त्यानंतर शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.

जळगाव तालुक्यातील बिलवाडी गावात गोपाळ आणि पाटील कुटुंबात जुना वाद उफाळून आला. रविवारी १४ सप्टेंबर रोजी दुपारी १ वाजात हा वाद विकोपाला गेला. दोन्ही कुटुंबांमध्ये जोरदार हाणामारी झाली, ज्यात एकनाथ गोपाळ यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत दोन्ही गटांतील १३ जण जखमी झाले, त्यापैकी दोन गंभीर जखमींची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यापैकी सहा आरोपींना अटक करण्यात आली आहे, मात्र एक आरोपी अजूनही फरार आहे.

फरार आरोपीच्या अटकेत होणाऱ्या विलंबाबद्दल आणि आरोपींना कठोर शिक्षा मिळण्याची मागणी करण्यासाठी गोपाळ कुटुंबाने सोमवारी १५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता शहराच्या मुख्य रस्त्यावरील आकाशवाणी चौकात रास्ता रोको आंदोलन सुरू केले. कुटुंबातील सदस्य, नातेवाईक आणि काही समर्थकांनी रस्त्यावरच ठिय्या देत पोलीस आणि प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या अचानक झालेल्या आंदोलनामुळे चौकातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले.

आंदोलनाची माहिती मिळताच, स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, पण आंदोलक आपल्या मागणीवर ठाम होते. जोपर्यंत फरार आरोपीला अटक होत नाही आणि सर्व आरोपींवर कठोर कारवाईचे आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. दरम्यान मयताच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना निवेदन सादर केले. पोलीस प्रशासनाकडून आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला. त्यानंतर दुपारी १२ वाजता शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.


Protected Content

Play sound