मुंबई प्रतिनिधी । राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पदाधिकारी मेहबूब शेख यांच्यावर अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी केली आहे.
याबाबत वृत्त असे की, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब इब्राहिम शेख यांच्या विरोधात सिडको पोलिस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. बायजीपुरा भागात खाजगी शिकवणी घेणार्या २९ वर्षीय तरुणीला नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकरणांशी आपला काहीही संबंध नसून, महिलेचा बोलविता धनी कोण आहे, याचा शोध पोलिसांनी घ्यावा, असे आव्हान मेहबूब शेख यांनी दिले आहे.
दरम्यान, या प्रकरणावरून आता चित्रा वाघ यांनी शेख यांना अटक करण्याची मागणी केली आहे. याबाबत त्या म्हणाल्या की, महिला सुरक्षेच्या बाता मारणार्या राज्य सरकार मधील राष्ट्रवादीचा पदाधिकारी तथा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख याच्यावर औरंगाबादमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. त्याला तात्काळ अटक करण्याची मागणी वाघ यांनी केली आहे.
एखाद्या सामान्य माणसावर अश्या प्रकारे गुन्हा दाखल झाला असता तर त्याला तात्काळ अटक झाली असती पण केवळ सरकार मधील राष्ट्रवादीचा पदाधिकारी आहे म्हणून पोलीस गप्प बसले आहेत. आगामी शक्ती विधेयकात सत्ताधारी पक्ष कार्यकर्त्यांसाठी काही वेगळे नियम बनवलेत का ? याचे उत्तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी द्यावे, असेही चित्रा वाघ यांनी म्हटले आहे.