आदित्य ठाकरे यांना अटक करा : महायुतीच्या नेत्यांची मागणी !

मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | दिशा सालियन हत्याप्रकरणी शिवसेना (ठाकरे गट) नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप होत असून, महायुतीच्या नेत्यांनी त्यांच्या अटकेची मागणी केली आहे.

सतीश सालियन यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत आदित्य ठाकरे आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. तसेच, या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण विभागाकडे सोपवावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.

शिवसेना (शिंदे गट) आमदारांनी विधिमंडळ परिसरात मूक आंदोलन करत सीबीआय चौकशीची मागणी केली. दिशाच्या वडिलांनी काही लोकांवर संशय व्यक्त केला असून, त्यांना न्याय मिळावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.

भाजप नेते आणि मंत्री नितेश राणे यांनी या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेत “ही केस अतिशय सोपी आहे, जर ही आत्महत्या असेल तर पाच वर्षांपासून लपवालपवी का सुरू आहे?” असा सवाल केला. राणे यांनी सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा दाखला देत सांगितले की, “बलात्काराचा आरोप झाल्यास तातडीने गुन्हा दाखल करून चौकशी केली पाहिजे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांना अटक करून तपास केला जावा.”

शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी दावा केला की, “दिशा सालियनची हत्या झाली असून, या प्रकरणात अनेक लोकांचा समावेश आहे. पोलिस तपासात जो दोषी ठरेल, त्याला शिक्षा होणारच.

या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना आदित्य ठाकरे म्हणाले, “गेल्या पाच वर्षांपासून बदनामीचा प्रयत्न सुरू आहे. हे प्रकरण न्यायालयात आहे, त्यामुळे आम्ही न्यायालयातच उत्तर देऊ.

Protected Content