मुक्ताईनगर लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर तालुक्यातील काकोडा येथे किरकोळ शाब्दिक वादाचे रूपांतर मोठ्या हाणामारीत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शासनाचे जमाबंदी आदेश लागू असतानाही बेकायदेशीर मंडळी जमवून एका कुटुंबावर काठ्या आणि दगडांनी हल्ला करण्यात आला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबात अधिक माहिती अशी की, चंद्रकांत निना चोपडे (वय ५५, रा. काकोडा) यांची मुलगी स्वाती पाटील आणि संशयित आरोपीची बहिण गीता शेळके यांच्यात जुना शाब्दिक वाद झाला होता. याच वादाचा राग मनात धरून, १८ मार्च रोजी दुपारच्या सुमारास संशयित आरोपी महादेव गोपाळ गावंडे, पुरुषोत्तम महादेव गावंडे, आकाश महादेव गावंडे (तिन्ही रा. वढोदा), विठ्ठल महादेव इंगळे आणि विजय महादेव इंगळे (दोन्ही रा. काकोडा) यांनी गोंधळ घालून चंद्रकांत चोपडे यांना शिवीगाळ करत लाकडी काठीने बेदम मारहाण करून गंभीर दुखापत केली. एवढेच नाही तर “पुन्हा रोडवर दिसलात तर ट्रकखाली चिरडून मारून टाकू,” अशी जीवे मारण्याची धमकीही कुटुंबाला देण्यात आली.

याप्रकरणी चंद्रकांत चोपडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मारहाण करणारे महादेव गोपाळ गावंडे, पुरुषोत्तम महादेव गावंडे, आकाश महादेव गावंडे (तिन्ही रा. वढोदा), विठ्ठल महादेव इंगळे आणि विजय महादेव इंगळे (दोन्ही रा. काकोडा) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोकॉ अशोक जाधव करत आहेत.



