वरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | वरणगाव शहरातील सम्राट नगर येथील रहिवासी आणि भारतीय सेनेतील जवान, दहा युनिट महार रेजिमेंट नायक अर्जुन लक्ष्मण बावस्कर (वय ३५) यांचे अरुणाचल प्रदेश येथे देशसेवा बजावत असताना निधन झाले. त्यांचे पार्थिव गुरुवारी, दि. २७ मार्च रोजी, शासकीय इतमामात अंत्यसंस्कारासाठी वरणगाव येथे आणण्यात येणार आहे.
अधिक माहिती अशी की, अरुणाचल प्रदेश येथे रात्रीची गस्त घालत असताना अर्जुन बावस्कर यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण शहरात शोककळा पसरली आहे. अर्जुन बावस्कर हे कर्तव्यपरायण आणि शिस्तप्रिय सैनिक होते. आपल्या सेवेत सदैव तत्पर असलेल्या या जवानाच्या निधनाने कुटुंबीय, नातेवाईक तसेच गावातील नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
अर्जुन बावस्कर हे गेल्या पंधरा वर्षांपासून देशाच्या विविध भागात सेवा बजावत होते. त्यांच्या सेवानिवृत्तीला अवघी दोन वर्षे बाकी असताना त्यांचे अकस्मिक निधन झाले. त्यांचा अंत्यविधी गुरुवारी, त्यांच्या राहत्या घरातून शहरातील मुख्य स्मशानभूमीत शासकीय इतमामात पार पडणार आहे. त्यांचे अंत्यसंस्कार संपूर्ण लष्करी सन्मानाने करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई-वडील, भाऊ आणि बहीण असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने गावात शोकसागर पसरला असून, अनेकांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.