पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरासमोर सडा टाकण्याच्या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादातून हाणामारीत झाल्याची घटना लोहारा येथे घडली आहे. यात एका रिक्षाचालकाच्या डोक्यात कुऱ्हाड मारून त्याला गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत अधिक माहिती आशी की, पाचोरा तालुक्यातील लोहारा गावातील रहिवाशी रवींद्र प्रकाश पांढरे (वय ३९) हे आपल्या कुटुंबासह राहतात. ८ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्यांच्या घरासमोर सडा टाकण्यावरून आरोपींसोबत वाद झाला. यावेळी संशयित रवींद्र नामदेव हटकर आणि लताबाई नामदेव हटकर यांनी रवींद्र यांची आई आणि भावाला धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली.

रवींद्र पांढरे यांनी मध्यस्थी करत विचारपूस केली असता, आरोपी रवींद्र हटकर याने “तुला सोडणार नाही” अशी धमकी दिली. रागाच्या भरात त्याने घरातून कुऱ्हाड आणून रवींद्र यांच्या डोक्यात जोरदार वार केला. या हल्ल्यात रवींद्र गंभीर जखमी होऊन खाली पडले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. याप्रकरणी पिंपळगाव हरेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी हे करीत आहे.



