भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ शहरातील मुस्लिम कॉलनी परिसरात बाथरूमचा पाईप काढण्याच्या किरकोळ कारणावरून जोरदार वाद झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत होऊन, पती-पत्नीला शिवीगाळ करत विटांनी मारहाण केली. या घटनेत पतीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून, याप्रकरणी शनिवारी ७ फेब्रुवारी रोजी बाजारपेठ पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, वहिदा शेख वसिम (वय २९) या त्यांच्या कुटुंबासह मुस्लिम कॉलनी भागात राहतात. ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ४:३० वाजेच्या सुमारास, शे. शफी शे. साबिर याने वहिदा यांना त्यांच्या घराचा बाथरूमचा पाईप काढून टाकण्यास सांगितले. त्यावर वहिदा यांनी “आमच्या घराचा पाईप तुमच्या घरापासून खूप लांब आहे,” असे उत्तर दिले. या साध्या बोलण्याचा राग आल्याने आरोपीने वाद घालण्यास सुरुवात केली. वादाचे पर्यावसान शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. संशयित आरोपी शे. शफी शे. साबीर, शे. सैफू शे. शफी, शे. शफीची आजी आणि शे. बबलू शे. साबीर या चौघांनी मिळून वहिदा आणि त्यांचे पती शेख वसिम यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली व हातातील विटा वसिम यांच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली.

मारहाण केल्यानंतर आरोपींनी “तुम्हाला इथे राहू देणार नाही, तुम्हाला बघून घेऊ” अशी जीवे मारण्याची धमकी दिली. वहिदा शेख यांच्या तक्रारीवरून भुसावळ बाजार पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस कर्मचारी परीष जाधव करत आहेत.



