मुंबई प्रतिनिधी । कंगना राणावत प्रकरणी हिंदीतून भाष्य करणार्या देवेंद्र फडणवीस यांना जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जोरदार टोला लगावत तुम्ही विरोधी पक्षनेते आहात की बिहार भाजपचे प्रभारी ? असा प्रश्न विचारला आहे.
कंगना राणावतच्या कार्यालयावर मुंबई महापालिकेने केलेल्या कारवाईनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरे सरकारवर टीका केली. मात्र, टीका करताना फडणवीस यांनी हिंदीतून भाष्य केलं. त्यावर जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी त्यांना टोला लगावला आहे.
विषय महाराष्ट्राचा प्रतिक्रिया हिंदीत? महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते बोलत आहेत की भाजपचे बिहार निवडणूक प्रभारी हे महाराष्ट्रातील जनतेला कळायला हवं?, असं जयंत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना विचारलं आहे. फडणवीस हे बिहार भाजपचे प्रभारी असून तेथे निवडणूक तोंडावर असल्यानेच भाजपने सुशांत राजपूत आत्महत्या प्रकरण आणि नंतर कंगना राणावत प्रकरणी पाठींबा दिल्याची चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमिवर, जयंत पाटील यांनी फडणवीस यांना खोचक प्रश्न विचारला आहे.