जळगाव प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील मौजे पाळधी बु.|| ग्रामपंचायतीसाठी जलजीवन मिशन अंतर्गत पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाची दोन एकर जमीन वापराकरीता उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाचे नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या ठरावास व्यवस्थापन परिषदेने शुक्रवारी मान्यता दिली.
प्रभारी कुलगुरू प्रा.ई.वायुनंदन यांच्या अध्यक्षतेखाली व्यवस्थापन परिषदेची ऑनलाईन बैठक झाली. पाळधी बु.|| ग्रामपंचायतीसाठी नवीन पाणी पुरवठा योजने करता उंच पाण्याची टाकी व फिल्टर प्लँट उभारण्यासाठी विद्यापीठाच्या ताब्यातील दोन एकर जमीन द्यावी. असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत विद्यापीठाला दिले होते. यावेळी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील आदी उपस्थित होते. त्या अनुषंगाने जिल्हा अधिकारी अभिजित राऊत यांनी विद्यापीठाला या जागेसाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले जावे असे पत्र पाठविले होते.
शुक्रवारी व्यवस्थापन परिषदेच्या तातडीच्या बैठकीत नाहरकत प्रमाणपत्र देण्याच्या कार्यवाही बाबत चर्चा झाली. विद्यापीठाच्या मालकीची दोन एकर जागा विना मोबदला वापरण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेण्यात आला. या जमीनीचा मालकी हक्क विद्यापीठाचाच राहील. विद्यापीठ आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (पाळधी ग्रामपंचायतीच्यावतीने) यांच्यात ३५ वर्षांच्या कालावधी करता सामंजस्य करारनामा करण्यात यावा, जलशुध्दीकरण प्रकल्पाच्या पाण्याचा फायदा विद्यापीठाच्या विविध विभागांना कोणताही कर न भरता नि:शुल्क होईल याचा समावेश करारनाम्यात करण्यात यावा. यासह काही मुद्यांवर चर्चा करण्यात येऊन हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तातडीने नाहरकत प्रमाणपत्र देण्यात येऊन विद्यापीठ कायद्यानुसार ही जमीन वापरण्यासाठी करावी लागणारी हस्तांतरण प्रक्रिया लक्षात घेता शासनाची कार्योत्तर मंजूरी मिळण्यासाठी राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याचा निर्णय ही व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत घेण्यात आला.
दोन वर्षांपूर्वी पाळधी ग्रामपंचायतीने पाणी पुरवठा योजनेसाठी जमीन उपलब्ध करून देण्यासाठी विद्यापीठाला पत्र दिले होते. या संदर्भात व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील यांच्या अध्यक्षतेखाली दीपक पाटील, प्राचार्य राजू फालक, कार्यकारी अभियंता इंजि.एस.आर.पाटील यांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने केलेल्या शिफारशींवरही आजच्या बैठकीत चर्चा झाली. या बैठकीस प्रभारी प्र-कुलगुरू प्रा.बी.व्ही.पवार, दिलीप पाटील, प्राचार्य आर.एस.पाटील, प्रा.एस.आर.चौधरी, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्राचार्य डॉ. राजू फालक, प्रा.मोहन पावरा, डॉ.महेश घुगरी, दीपक पाटील, डी.पी.नाथे, प्रभारी कुलसचिव प्रा.आर.एल.शिंदे, एस.आर.गोहिल,प्रा.डी.एस.दलाल उपस्थित होते.